आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक:253 ग्रा.पं.साठी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानास होणार सुरुवात

टीम दिव्य मराठी | जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २५३ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ८२९ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी आवश्यक मतदान साहित्य घेऊन अधिकारी-कर्मचारी त्या-त्या केंद्रांवर शनिवारी दुपारी रवाना झाले. तर पूर्वानुभव लक्षात घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ३० संवेदनशील केंद्रांवर १३०० पाेलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क निकोप वातावरणात पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.२०) त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

सार्वत्रिक निवडणुका असलेल्या एकूण ग्रामपंचायतींची संख्या २६६ होती, यापैकी १७ ग्रामपंचायतीत पूर्णत: बिनविरोध निवड झाली तर एकाही जागेवर नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे तसेच माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी एकच वैध नामनिर्देशनपत्र शिल्लक राहून जागा बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष मतदान न होणाऱ्या १३ ग्रामपंचायती आहेत.

यामुळे प्रत्यक्षात २५३ ग्रामपंचायतींसाठीच मतदान होत आहे. तसेच माघारीनंतर एकच नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या १६ असल्यामुळे २५० ठिकाणी सरपंच पदासाठी तर १८३६ सदस्यांच्या जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत व्होटर अॅपचा वापर केला जाणार असून निवडणूक आयोगाकडून एकूण ८२९ मतदान केंद्रे निश्चित केली असून ३ लाख ५१ हजार ७८८ मतदारांना याठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून मतदारांना सुरक्षितपणे मतदान करता यावे, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.

ही आहेत जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रे
रामनगर, नेर (ता. जालना), जामखेड, पिपंरखेड, चिंचखेड (ता. अंबड), राणी उंचेगाव, कुंभारपिंपळगाव (ता. घनसावंगी), श्रीपत धामनगाव, दहीफळ भोंगाने, वरफळ, बाबुलतारा, खांडेपोखरी, अंबिलवाडी, आष्टी, लोणी, रायगव्हाण, श्रीष्टी (ता. परतूर), तळणी, कर्नावळ (ता. मंठा), वरुड बु. (ता. जाफराबाद), लतीफपूर, राजूर, जवखेडा खुर्द, जवखेडा बु., अवघडराव सांवगी, कोल्हापूर बोरखेडी, वीरखेडा, भालकी, खासगाव, डोलखेडा बु. (ता. भोकरदन) ही संवेदनशील केंद्रे निश्चित करत पोलिसांची अधिकची कुमक याठिकाणी तैनात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...