आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना, बदनापूर, अंबड आणि भोकरदन या तालुक्यांतील ३२६ गावांसाठी वॉटरग्रिड योजना राबवली जाणार आहे. जायकवाडी प्रकल्प हा योजनेच्या पाण्याचा प्रमुख उद्भव असेल. जवळपास ८०० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरी दिली असून येत्या १५ दिवसांत डीपीआर तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर व आमदार नारायण कुचे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, बाळासाहेबांची शिवसेनेचे संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मोहन अग्रवाल, भास्कर मगरे, बाबासाहेब इंगळे, संतोष मोहिते व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. माजी मंत्री खोतकर म्हणाले, जल जीवन मिशनअंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. जालना व बदनापूर विधानसभा मतदारसंघात ३२६ गावांसाठी दीड हजार किलोमीटर लांबीची जलवाहिनी अंथरण्यात येईल. पुढील ३० वर्षांचे नियोजन करून ही वॉटरग्रिड योजना तयार केली जाईल. पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळेल. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात शुक्रवारी बैठक झाली.
५० टक्के केंद्राचा निधी जालना आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघातील एकूण ३२६ गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. यात जालना तालुक्यातील ११०, बदनापूर ८५, अंबड ७३ आणि भोकरदन तालुक्यातील ५८ गावांमध्ये ही वॉटरग्रिड योजना राबवण्याचे प्रस्तावित असल्याचे माजी मंत्री खोतकर यांनी सांगितले. या योजनेसाठी केंद्र शासनाचा ५० टक्के व राज्य शासनाचा ५० टक्के निधी मिळणार आहे.
आणखी गावे वाढणार बदनापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांच्या योजना चार महिन्यांतच कोरड्या पडतात. त्यानंतर गावांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या गावांसाठी वॉटरग्रिड योजना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ही योजना राबवण्याची मागणी दोन ते तीन महिन्यांपासून लावून धरली होती. यात आता भोकरदन विधानसभा मतदारसंघातील गावे वाढवण्यासाठी आमदार संतोष दानवे प्रयत्नशील आहेत. -नारायण कुचे, आमदार, बदनापूर विधानसभा या धरणातून पाणी योजनेला जायकवाडी धरणासह राजेवाडी, वाल्हा, सोमठाणा, पळसखेडा दाभाडी व बाणेगाव तलावातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. १२० एमएलडी क्षमतेची ही योजना असून यासाठी सुमारे ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हातवण प्रकल्पाची क्षमता ४५ मीटर क्यूबपर्यंत वाढवणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.