आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलं हीच खरी संपत्ती असल्याने व ही संपत्ती प्रामुख्याने पालकांच्या वर्तनावर अवलंबून असल्याने त्यांना चांगले निर्माण करण्यासाठी पालकांनी स्वत: चांगले वागावे आणि वर्तनातून मुलांना सांगावे म्हणजे मुलं चांगली घडतील असे प्रतिपादन ज्ञानदास डॉ. विजयकुमार फड यांनी केले.
भेाकरदन तालुक्यातील गारखेडा येथे दरवर्षीप्रमाणे हनुमान मंदिराच्या पटांगणात यंदाही भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कीर्तन सेवेचे पुष्प गुंफतांना डॉ. फड यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या, “अंतरिची घेतो गोडी। पाहे जोडी भावाची॥ “ या अभंगावर कीर्तन केले. आईवडिलांचे खरे हित त्यांची मुलं चांगली निर्माण होण्यात असते व मुलं हीच खरी संपत्ती असते असे सांगून ते म्हणाले की, मुलं ही केवळ मोठ्या शहरात, मोठ्या महाविद्यालयात गेल्याने किंवा चार-दोन खासगी शिकवण्या लावल्याने चांगली निर्माण होत नाहीत, तर त्यांच्यावर घरात होणारे संस्कार महत्त्वाचे असतात. त्यामुळे आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांशी, बहीण भावंडांशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी चांगले वागले पाहिजे. चांगले वागण्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही तर फक्त मीपणा, ईर्षा, व्देष, मत्सर, अहंकार, काम, क्रोध या मानवतेच्या शत्रूंचा त्याग करुन चांगले वागावे लागते, असे फड म्हणाले. तुकाराम महाराजांच्या, कन्या पुत्र होती जी सात्वीक। तयाचा हरिख वाटे देवा॥ या अभंगाप्रमाणे कन्या आणि पुत्रात फरक न करता मुलांची सात्वीकता वाढवून आपणही आनंद घ्यावा आणि इतरांनाही आनंद मिळू द्यावा. पालकांकडून होणाऱ्या चुकीच्या वर्तनाचा विपरित परिणाम मुलांवर होत असतो. असा झालेला परिणाम सहजासहजी दुरूस्त करता येत नाही. मुलं केवळ सांगण्याने घडत नाहीत तर आईवडिलांची, वडिलधाऱ्यांची कृती पाहून त्याचे अनुकरण करीत असतात. म्हणून पालकांनी ‘आधी केले मग सांगीतले’ असे वागले पाहिजे. भगवंताला भक्ताच्या अंतरंगातील गोडवा आवडतो, त्यामुळे आतून बाहेरून चांगले वागणे सर्वांसाठी हितावह असते. अंतरंग चांगले असेल तर अनेक समस्या निर्माणच होत नाहीत. वृक्षारोपण, पाणी अडवणे, स्वच्छता ठेवणे, कन्यापुत्रात, सुनलेकीत फरक न करणे, व्यसनमुक्त राहणे, पत्नीचा जीवनसाथी, अर्धांगिणी म्हणून आवश्यक तो मानसन्मान ठेवणे अशी कार्ये चांगल्या अंतरंगामुळे सहज होत असतात, असेही ते म्हणाले. याप्रसंगी संत वचनांच्या आधारे आत्महत्या हे महत्पाप असल्याचे पटवून दिले. संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तन होऊन उपस्थित सर्व भक्तांना किर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. संयोजकांनी कीर्तन वेळ ७ ते ९ व त्यानंतर महाप्रसाद ठेवल्याने फड व अनेक भाविकांनी आनंद व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.