आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मौंत का कुआँ:कुशीत घेऊन ‘त्या’ चिमुकलीचे काटे काढताना वेदना मात्र आम्हाला झाल्या; जामवाडीच्या विहिरीत कार पडलेल्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना अश्रू अनावर

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारच्या रात्री अशीच एक कार पाण्यात पडली तेव्हाही अशोक पवार व तौफिक अली दाेघेच याचे साक्षीदार होते

जालना-देऊळगावराजा रस्त्यावरील जामवाडीजवळ विहिरीत कार पडून दाेन दिवसांत चार जणांचा जीव गेला. रविवारी सकाळी घडलेली घटना तर अंगावर काटा आणणारी हाेती. भरधाव कार रस्त्याच्या कडेला पडत असताना कारमधील आरती गोपाल फानदडे (३०) या माउलीने तिच्या कुशीतील दीड वर्षाच्या चिमुकलीला कारच्या बाहेर फेकल्याने तिचा जीव तर वाचला; पण आई व तिच्या दुसऱ्या मुलीचा मात्र करुण अंत झाला. या घटनेबद्दल सांगताना प्रत्यक्षदर्शी असलेले कँटीन चालक अशोक पवार व ढाबामालक तौफिक अली हेसुद्धा अश्रूंना आवर घालू शकले नाही. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेचे केलेले वर्णन त्यांच्याच शब्दांत....

दुकान उघडण्यासाठी सकाळची आवराआवर सुरू होती. तितक्यात आम्हा दोघांनाही अचानक टायर घासण्यासह कर्ण कर्कश कर्र.. कर्र..असा मोठा आवाज आला. धडकी भरणारा तो आवाज ऐकताच मोठे विपरीत घडल्याचे लक्षात आले. आम्ही लागलीच बाहेर येऊन पाहिले तर कार रोडच्या कडेलाच असलेल्या विहिरीत पडलेली दिसली. ते दृश्य पाहून करावे तरी काय, काहीच सुचत नव्हते. दोघेही स्तब्ध झालो. इतर कोणाला मदतीला बोलावणार तोच विहिरीच्या जवळील मोकळ्या जागेत असणाऱ्या काट्यातून दीड वर्षाचे बाळ रडतानाचा आवाज येऊ लागला. आवाजाच्या दिशेने दोघांनी कूच केली. पाहतो तर काय काट्यात एक निरागस बाळ वेदननं विव्हळत होतं. पटकन त्या नाजूक बाळाला कवेत घेतलं. त्या चिमुकलीच्या पाठीवर खोलवर घुसलेले काटे काढताना चिमुकलीच्या दुप्पट आम्हाला वेदना होत होत्या. त्या बाळाला खड्ड्यातून बाहेर काढेपर्यंत ती कार विहिरीतील पाण्यात पूर्णपणे बुडाली होती. त्या मुलीकडं पाहावं की कारमधील लोकांना वाचवावं हेच कळेना. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना आवाज दिला व काही ग्रामस्थ व सरपंचांना याची माहिती दिली. आपापल्या घाईत निघालेली काही वाहनेही थांबली. सगळेजण पळापळ करू लागले. अचानक पाण्यात हालचाल दिसू लागली. एकटक पाहिले तेव्हा पोहत दोघे जण वर आले. त्यांना मदत दिली आणि गोपाल विठ्ठल फानदडे व चालक गुणवंत वानखेडे हे दोघे विहिरीबाहेर आले. ही घटना पाहताना मन अगदी खिन्न झाले होते. शुक्रवारच्या रात्री अशीच एक कार पाण्यात पडली तेव्हाही आम्ही दाेघेच याचे साक्षीदार होतो. तेव्हा बराच वेळ मदतकार्य केल्यानंतर दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. किमान आज तरी एकाचाही मृतदेह पाहायला लागू नये, अशी प्रार्थना दोघेही मनोमन करत होतो. पण दुर्दैवाने दीड वर्षाच्या चिमुकलीला जीवदान देणारी ती माउली व तिच्या दुसऱ्या मुलीचा मृतदेह पाहण्याची वेळ आमच्यावर आली. गेल्या तीन दिवसांत आम्ही ही दुसरी घटना पाहिली आहे. असा प्रसंग कुणावरही येऊ नये.

एका बाजूनेच वाहतूक सुरू

जालना जिल्ह्यातून विदर्भाकडे जाणाऱ्या देऊळगावराजा रोडवरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी पूल, वळण रस्ते असल्यामुळे या ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक करावी लागत आहे. परंतु, या ठिकाणी कुठलेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वीच बीडकडून देऊळगाव राजाकडे जाणारी ब्रिझा कार याच विहिरीमध्ये पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना रविवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही दुसरी हृदयद्रावक घटना घडली.