आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामे:तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने भविष्याचा वेध घेतला पाहिजे

अंबड2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पालकमंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन, मत्स्योदरीत अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने भविष्याचा वेध घेतला पाहिजे. सध्या नावीन्यपूर्ण उद्योगांना विविध सवलती आहेत याचा लाभ घेतला पाहिजे. सूर्यासारखे चमकण्यासाठी तापावे लागते तसेच जीवनात कष्टाला पर्याय नाही. कामाचा ध्यास असावा लागतो त्यातून यशाचा मार्ग सापडतो. आत्मविश्वास, धाडस असेल तर यशस्वी होता येईल. आवडीच्या क्षेत्रातील कामाला प्राधान्य द्या त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेऊन वाटचाल करा. आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी काम करावे त्यांना जीवनमूल्य देण्याबरोबरच आत्मविश्वास निर्माण करावा, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. अंबड येथे शनिवारी सायंकाळी मत्स्योदरी विद्यालयात अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राधाकृष्ण गायकवाड, निवृत्त प्राचार्य भागवत कटारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, कल्याण सपाटे, बाजार समितीचे सभापती सतीश होंडे, बाळासाहेब नरवडे, डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य शहाजी गायकवाड, मुख्याध्यापक अरविंद देव, पांडुरंग घोगरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री टोपे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात उद्योजक, लेखक, उद्योजक, शास्त्रज्ञ तसेच नवनिर्मिती करणारे चांगले व्यावसाय करू शकतील. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कल्पकता वापरून नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख कल्याण सोळुंके यांनी संशोधनाची आवड निर्माण व्हावी व सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत तालुक्यातून शहरातील मत्स्योदरी विद्यालयाची निवड करून येथे अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. विज्ञान अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे व त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या आधुनिक प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांनी आरोग्याची निर्मिती केली आहे. तसेच या प्रयोगशाळेत संशोधनात्मक आवश्यक विविध साहित्य उपकरणे बसवण्यात आली आहेत. यात ३ डी प्रिंटरपासून अन्य अत्याधुनिक विज्ञान साहित्य उपलब्ध आहे. असे सांगितले. सूत्रसंचालन दशरथ बुनगे, काकासाहेब कणके यांनी, तर आर. एन. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सर्जनशीलतेला वाव द्यावा
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचे काम करावे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाटचाल करताना विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात विचार अंगीकृत करण्याची संस्कृती निर्माण व्हावी. विद्यार्थी सर्वांगीण दृष्टीने परिपूर्ण व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मितीची संधी मिळणार असल्याचे डॉ. बी. आर. गायकवाड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...