आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमच्या मुलांना टक्केवारी असताना चांगले कॉलेज मिळत नाही, नोकरीत डावलले जाते, आमच्या पुरुषांना नोकरीत बढती मिळत नाही, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली, अनेक कुटुंबांना एकवेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. यामुळेच आरक्षण मिळण्यासाठी आम्ही गेल्या ५७ दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करीत आहोत. ५७ दिवस झाले कुणी लक्ष देईना, हे आंदोलन महिलांचे आहे, तुम्ही पुरुषांना का अटक करता, असे म्हणत आक्रमक झालेल्या महिलांनी पोलिसांच्या हातातील काठी घेऊन पोलिसांना घेराव घालत रणरागिणी आक्रमक होऊन घोषणाबाजीने साष्टपिंपळगाव दणाणले.
राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून अनेक लोकप्रतिनिधींनी येऊन पाठिंबा दिला आहे. परंतु, अख्खं गाव आंदोलनाला बसूनही आरक्षण मिळत नसल्यामुळे येथील काही वृद्ध, तरुण, महिला, तरुणींनी अन्नत्याग उपोषणही केले. मात्र, कुणाचा जीव जाऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी येऊन अन्नत्याग उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. तेव्हापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे.
मराठा आरक्षणासाठी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना साकडे घालण्यासाठी मंगळवारी साष्टपिंपळगाव येथून बारामतीकडे आक्रोश विनंती रॅली काढण्यात आली. मात्र, रॅलीस सुरुवात होण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे साष्टपिंपळगावकरांनी रास्ता रोको केला. महिलांनीही आक्रमक होत पोलिस प्रशासनाला जाब विचारला. सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या वेळी आंदोलकांनी केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्टपिंपळगाव येथे मागील ५७ दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनास आजपर्यंत राजकीय पदाधिकाऱ्यांसह मराठा समाजातील नेते, संत-महंतांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शवला आहे.
महिलांनी पोलिसांना आडवे येऊन केला रास्ता रोको : महिलांनीही आंदोलकांना ताब्यात का घेता म्हणत पोलिसांना आडवे होऊन जाब विचारला. आंदोलकांना दंगा नियंत्रण व्हॅनमध्ये बसवून अंबडला नेण्यात आले. आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन रास्ता रोको करत पोलिस प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाईनंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
आंदोलन चिघळू नये म्हणून गोंदी ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, उपनिरीक्षक निरीक्षक हनुमंत वारे हे मोठ्या फौजफाट्यासह आंदोलनस्थळी पोहोचले. पोलिसांनी बारामतीकडे निघालेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले. या वेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.