आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामांचा शुभारंभ:जालना बाजार समितीत नऊ कोटी रुपये खर्चून होणार कामे; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समिती गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असून माजी राज्यमंत्री तथा सभापती अर्जुन खोतकर यांनी केलेल्या कामांमुळे आज जालना समिती महाराष्ट्रात नंबर वन आहे. हा पहिला क्रमांक कायम राहावा म्हणून खोतकरांनी विविध विकासकामे मार्गी लावून बाजार समितीला विकासाच्या दिशेने नेले. सर्वच बाबतीत अव्वल असलेल्या जालन्यात बाजार समिती इतर बाजार समित्यांना आदर्श घालून देणारी असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

नऊ कोटी रुपये खर्चून केल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण, अडीच कोटी रुपये खर्चून केल्या जाणाऱ्या मार्केट यार्डाच्या संरक्षण भिंतीचे काम आणि २ कोटी ७० लाख रुपये खर्चून बाजार आवारातील सेक्टर क्र.८ मध्ये काँक्रीट रस्ते व पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी सभापती अर्जुन खोतकर तर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत खैरे, हिंगोलीचे खा. हेमंत पाटील, आ. अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, युवा सेनेचे विभागीय सचिव अभिमन्यू खोतकर, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, सीईओ मनुज जिंदल, अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मंत्री आदींची उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले की, सर्वच बाबतीत नंबर वन असलेल्या जालन्याने आता खोतकर यांच्या पुढाकाराने जालना बाजार समितीत रेशीम कोष खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आपला कोष बंगळुरू येथे घेऊन जावा लागत होता. प्रवासाची दगदग, वेळ, पैशांचा होणारा अपव्यय त्यांच्या लक्षात आल्याने खोतकरांनी जालन्यातच ही सुविधा सुरू करून शेतकऱ्यांचा ताण वाचवला. अशी केंद्रे आता ठिकठिकाणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन भाऊसाहेब घुगे यांनी तर संतोष मोहिते यांनी आभार मानले.

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या शुभेच्छा

पालकमंत्री राजेश टोपे हे साखर महासंघाच्या कार्यक्रमानिमित्त पुण्याला असल्यामुळे बाजार समितीच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु, त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या भाषणाच्या पूर्वी शुभेच्छा दिल्या. जनता जाब विचारणार सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जालना बाजार समितीचा राज्यात मोठा नावलौकीक असल्याचे सांगून मंत्री सत्तार यांनी खोतकरांच्या कामाचे कौतुक केले. केंद्र सरकारवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, या देशावर मोगल, इंग्रजांनी राज्य केले, परंतु महात्मा गांधी यांच्या साध्या काठीने त्यांना शेवटी जावेच लागले.

केंद्रानेही जाचक कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले होते, परंतु दिल्लीत मोठे आंदोलन झाल्याने अखेर सरकारला कायदे मागे घ्यावेच लागले. खोतकरांनी श्रीलंकेतील परिस्थितीचे वर्णन केले. भारतातही तशीच परिस्थिती असून भाजपला जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नसल्याचे ते म्हणाले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

बी खडकावर पडलं तरी वटवृक्ष होतोच
सोळा वर्षांपूर्वी मंत्री देसाई यांच्या हस्ते बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते तेव्हापासून ते आजपर्यंत ही समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. समितीवरील भगवा अजून उतरलेला नाही. मंत्री देसाई यांचे पायगुण चांगले आहे. त्यामुळे चांगलेच घडत गेले. वटवृक्षाचं बी खडकावर जरी पडलं तरी त्याचा वटवृक्ष होतो, अशी आमची शेतकऱ्यांची जात आहे. सर्व संकटांना तोंड देत जगाला पोसण्याचे प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापारी, हमाल, कामगार सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. राज्यातील पहिले रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर केल्याचे सांगून खोतकर यांनी रेशीम कोषच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी बंगळुरूला जावे लागत होते. परंतु, राज्यातील पहिले केंद्र जालन्यात सुरू करून केवळ जालना, मराठवाडाच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांची सोय केली. मागील वर्षी रेशीम कोषची नऊशे कोटींची उलाढाल झाली. जालन्याच्या मातीत उगवलेला कोष देशातला उत्तम कोष असून लांब धाग्याचा आहे, असे सभापती खोतकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...