आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिल्या लॉकडाऊनमधील कटू अनुभवातून धडा घेत राज्याच्या उद्योग विभागाने दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये दमदार कामगिरी केली. राज्याचे औद्योगिक उत्पादन ९० टक्क्यांहून अधिक सामान्य राहिले. दोन्ही लॉकडाऊनमध्ये १ लाख कोटीहून अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. नवीन उद्योगांच्या स्वागतासाठी ४० हजार एकर जागेवर “रेड कार्पेट’ अंथरण्यात आले आहे.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक श्रेणीतील उद्योगांनाच परवानगी, परप्रांतीय मजुरांची कमतरता, वाहतूक बंदी, कच्च्या मालाचा तुटवडा आणि तयार माल पोहोचवण्यासाठी झालेला खोळंबा यामुळे उद्योग क्षेत्र होरपळून निघाले. दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये चोख नियोजन केल्याने उद्योग चक्र गतिमान राहिले.
एप्रिल ठरला तेजीचा
राष्ट्रीय सर्वेक्षण खात्याच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये औद्योगिक उत्पादनात सरासरी १३४.४४ टक्के वाढ झाली. खाण क्षेत्रात १०८, उत्पादन क्षेत्रात १२५.१ तर इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात १७४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. उर्वरित. पान १०
४० हजार एकर जागा राखीव
नवीन उद्योगांसाठी मुंबई-ठाणे-रायगड येथे १५,००० एकर, पुणे-चाकण-तळेगाव-सातारा येथे ८००० एकर, नाशिक-मालेगाव-अहमदनगर येथे ५००० एकर, औरंगाबाद डीएमआयसी-जालना येथे ८००० एकर, तर नागपूर-अमरावती येेथे ४००० एकर अशी सुमारे ४० हजार एकर जागा तयार करण्यात आली आहे.
‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबना’स आले यश
राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता दररोज १३०० मे.टन असून दुसऱ्या लाटेत १८०० मे. टनची मागणी होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत ती दररोज ५०० टन वाढू शकते. विद्यमान १८०० टन आणि तिसऱ्या लाटेसाठी ५०० टन अशा २३०० टन ऑक्सिजनची दररोज गरज पडेल. ती पूर्ण करतानाच भविष्यात कमतरता भासू नये यासाठी राज्याने ३००० मे.टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवत ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ हाती घेतले आहे. या अंतर्गत लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे नवीन प्रकल्प तसेच जुन्याच्या विस्तारीकरणासाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.
१.१३ लाख कोटींचे करार
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत एमआयडीसी आणि १५ कंपन्यांमध्ये ३४,८५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २९ उद्योगांसोबत ५१,८९७ कोटींचे, तर तिसऱ्या टप्प्यात १४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. पहिल्या लॉकडाऊनपासून १,१२,९३९ कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येण्याचा मार्ग खुला झाला.
लॉकडाऊनमधील शुभ संकेत
विदेशी गुंतवणुकीत वाढ
दोन्ही लॉकडाऊनमध्ये उद्याेगचक्र अबाधित राहिले. सोबत नवीन गुंतवणूकदार आकर्षित झाले. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे भविष्यात आणखी कंपन्या आकर्षित होतील. विदेशी गुंतवणूक वाढून रोजगार निर्माण होतील. - सुभाष देसाई, उद्योगमंत्री, महाराष्ट्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.