आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:जिल्हयात 1 लाख चाचण्यांची घोषणा झाली पण रॅपीड अंन्टीजन किट आहेत कुठे ?, माहिती घेण्यापुर्वीच पालकमंत्र्यांची घोषणा अडचणीची

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • उधारीवर आलेल्या किट वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर परत

हिंगोली जिल्हयात १ लाख नागरीकांची रॅपीड चाचणी करण्याचे नियोजन असल्याची घोषणा पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली. मात्र सध्या तरी रुग्णालयात रॅपीड ॲन्टीजन किट नसल्याने त्यांची घोषणा प्रशासनासाठी चांगलीच अडचणीची ठरू लागली आहे. किट नसल्याने हिंगोलीत दुकानदारांच्या तपासणीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. त्यामुळे १ लाख चाचण्या होणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हिंगोली जिल्हयात प्रशासनाकडून कोरोना महामारीच्या काळातही उत्कृष्ठ कामकाज सुरु आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पालिका प्रशासन व पोलिस विभागाकडून योग्य प्रकारचे नियोजन करून कामकाज केले जात आहे. हिंगोली शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन दुकानदारांची रॅपीड ॲन्टीजन चाचणी घेऊन त्यानंतरच निगेटीव्ह अहवाल असलेल्या दुकानादारांना त्यांची व्यापारी प्रतिष्ठाणे उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या सुचनेनुसार हिंगोलीत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, कळमनुरीत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर तर वसमतमधे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या घेतल्या जात आहेत.

दरम्यान, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा हिंगोली दौरा झाल्यानंतर त्यांनी कोरोनामध्ये प्रशासनाचे कामकाज चांगले सुरु असल्याचे सांगत कामकाजाचे कौतूक केले. तर यावेळी त्यांनी तब्बल १ लाख नागरीकांची रॅपीड ॲन्टीजन चाचणी घेण्याचे नियोजन असल्याचेही जाहिर करून टाकले. मात्र त्यांचा दौरा संपताच इकडे ॲन्टीजन किटही संपल्या. केवळ शंभर ते दिडशेच किट प्रशासनाकडे शिल्लक राहिल्या आहे. सोमवारी ता. १७ दुपारपर्यंत किट उपलब्ध झाल्या नव्हत्या.

दरम्यान, सदर प्रकार लक्षात आल्यानंतर हिंगोलीत रविवारपासून बुधवारपर्यंत रॅपीड ॲन्टीजन चाचण्या करण्यास आरोग्य विभागाने असमर्थता दर्शविली. त्यामुळे या कालावधीत होणाऱ्या चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे. त्यामुळे १ लाख चाचण्या करण्याची घोषणा झाली असली तरी ॲन्टीजन किटच उपलब्ध होत असल्याने प्रशासन चांगलेच अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या घोषणेने प्रशासनालाही घाम फुटल्याचे बाेलले जात आहे. हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात किट नसल्या तरी इतर तालुक्याच्या ठिकाणी किट असल्याचे सांगत आरोग्य विभागाकडून कानावर हात ठेवले जात आहे.

उधारीवर आलेल्या किट वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर परत

हिंगोली येथे औंरंगाबाद येथून उसणवारीवर २००० किट आणण्यात आल्या होत्या. तर त्यानंतर हिंगोलीत किट उपलब्ध झाल्या तरी औरंगाबादच्या किट परत केल्या नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मध्यस्थी केल्यानंतर किट परत देण्यात आल्या.