आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पटावर विद्यार्थी 1 हजार, खिचडी खाण्यासाठी अवघे चाळीस जण, उन्हाळ्याचा आहार ऑगस्टमध्ये, त्यातही दिला सडलेला तांदूळ

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • शासकीय नियमानुसार असे व्हायला हवे पोषण आहाराचे वाटप

खासगी असो वा शासकीय, कोणत्याही शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचला नसल्याचे धक्कादायक वास्तव “दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टमध्ये पुढे आले आहे. कुठे शाळेच्या पटावर १ हजार विद्यार्थी असून खिचडी खाण्यासाठी फक्त चाळीसच विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले, तर कुठे शाळा बंद झाल्यापासून शिक्षकांना विद्यार्थ्यांचे पत्तेच मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. कुठे जून-जुलैचा आहार ऑगस्टमध्ये पोहोचवला जातोय तर कुठे किडलेला तांदूळ विद्यार्थ्यांच्या माथी मारला जातोय.

कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये याचा गवगवा शासनाच्या पातळीवर केला गेला. प्रत्यक्षात मात्र याच्या अंमलबजावणीतच कुपोषण आढळून आले आहे. पोषण आहार घरपोच देण्याचे आदेश शासनाने काढले, मात्र ३० ते ३५ टक्के विद्यार्थी गावाबाहेर गेल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. जिथे विद्यार्थी होते तेथे शिक्षक पोहोचले नाही. उन्हाळ्यात आलेले धान्य ऑगस्टमध्ये वाटप करण्यात येत आहे. मात्र, त्यातील तांदूळ सडलेला आहे, तर डाळी किडलेल्या. मुलांच्या शारीरिक-बौद्धिक विकासासाठी मध्यान्ह पोषण आहाराची ही योजना कार्यरत आहे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी याची सर्वार्थाने गरज असताना, त्यातच मोठा खंड पडल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

७० ते ८० मुलांना पोषण आहार मिळालाच नाही
९० टक्के शिक्षक हे शहरातून ग्रामीण भागात अपडाऊन करतात. मार्चपासून तर लॉकडाऊन होते. शाळा अजूनही उघडलेल्या नाहीत. शिक्षण विभागाने कितीही दावा केला तरी मुलांपर्यंत पोषण आहार पोहचलेला नाही. तक्रार केल्यास मुलांना त्रास होईल म्हणून पालकही बोलत नाहीत. हा आहार मुलांच्या पोटाऐवजी काळ्या बाजारात जात आहे. - प्रशांत साठे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ.

वाटप सुरू : पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. सध्या मागील वाटप सुरू आहे. आता जून आणि जुलैचा आहार पोहोचला. ३४ दिवसांचा पोषण आहार देण्यास सांगण्यात आले आहे. विद्यार्थी नसेल तर त्याच्या पालकांना बोलावून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. - भाऊसाहेब देशपांडे, शालेय पोषण आहार अधीक्षक

शासकीय नियमानुसार असे व्हायला हवे पोषण आहाराचे वाटप
प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी

तांदूळ ३.४०० ग्रॅम
मूग डाळ ६०० ग्रॅम
हरभरा १२०० ग्रॅम

माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी
तांदूळ ५.१०० ग्रॅम
मूग डाळ ९०० ग्रॅम
हरभरा १८०० ग्रॅम

केस क्रमांक : 1
शहरापासून ३० ते ३५ किलोमीटर असलेली जिल्हा परिषदेची शाळा. मार्चपासून शाळा बंद झाल्या. पोषण आहार देण्याच्या सूचनाही शिक्षकांना विलंबाने मिळाल्या. तोपर्यंत काही पालक स्थलांतरित झाले होते. त्यामुळे मुलांपर्यंत आहार पोहोचला नाही.

केस क्रमांक : 2
सोयगाव तालुक्यातील सुदाम (नाव बदललेले) हा पाचवीचा विद्यार्थी. लॉकडाऊनमध्ये मामाकडे अडकला. कोरडवाहू एक एकर जमिनीवर भागत नाही. त्यामुळे किमान लेकराच्या जेवणाची सोय पोषण आहारातून होईल असं वाटत होतं. पण, तोही पोहोचला नाही.

केस क्रमांक 3 : राधिकाची दोन मुलं अनुदानित खासगी शाळेत जातात. त्यांनी पोषण आहारासाठी शाळेत चौकशी केली तर सडलेला तांदूळ दाखवला. शिक्षक सांगताहेत, जून आणि जुलैच्या पोषण आहारातील साहित्य वाटप लवकरच केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...