आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मनोज वाजपेयीच्या दोन मिनिटांच्या दृश्यासाठी विमानतळावर 10 तास शूटिंग; ‘डिस्पॅच’च्या चित्रीकरणासाठी दोन दिवस मुक्काम

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात साकारले मुंबई-दिल्ली विमानतळ, 2011 च्या आयपीएलचे पोस्टरही लावले

चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी दुपारपासून कॅमेरे, लाइट, स्पीकर, ट्रॉली अशा साहित्याची जुळवाजुळव सुरू होती. संध्याकाळी दिग्दर्शकाने “लाइट, कॅमेरा, अॅक्शन’ म्हणत क्लॅप दिला आणि बॉलीवूड स्टार मनोज वाजपेयीने एक बॅग हातात तर दुसरी पाठीवर घेत विमानतळात ‘एन्ट्री’ घेतली. काही वेळात तो बाहेर आला अन‌् शॉट ओके झाला. अवघ्या दोन मिनिटांच्या या प्रसंगासाठी २०५ जणांच्या टीमने १० तास मेहनत घेतली. विशेष म्हणजे या सीनमध्ये एकही डायलॉग नव्हता.

मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिस्पॅच’ चित्रपटाचे चित्रीकरण औरंगाबाद विमानतळावर झाले. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या स्काय फिल्म्सच्या स्मृती जैन, दिग्दर्शक कानू बहल तर लाइन प्रोड्युसर दीपक मल्होत्रा आणि अमन पुरी आहेत. औरंगाबादच्या लाइन प्रोड्युसरची जबाबदारी प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांच्या “एट अवर्स’ने सांभाळली. अक्षय अहिरराव आणि भरत साळुंखे सहभागी होते.

मनोज मासिकाचा संपादक
या चित्रपटात मनोजची भूमिका मुंबईतील “डिस्पॅच’ या गुन्हेगारीविषयक मासिकाच्या संपादकाची आहे. चित्रीकरणात चिकलठाणा विमानतळ हे मुंबई आणि दिल्लीचे विमानतळ दाखवण्यात आले. पहिल्या प्रसंगात मनोज मुंबई विमानतळात जातो. तिकीट घेतो, चेक इन करतो आणि विमानाची प्रतीक्षा करत असताे. पत्नीचा फोन लागत नसल्याने मेसेज टाकतो. दुसऱ्या प्रसंगात तो सामान वाहून आणणाऱ्या बेल्टवरून बॅग घेतो आणि बाहेर येतो. या प्रसंगात तो संध्याकाळी दिल्ली विमानतळातून बाहेर पडताना दाखवण्यात आले आहे. २०११ च्या आयपीएलचा काळ दाखवण्यासाठी परिसरात क्रिकेट सामन्यांचे पाेस्टर्सही लावले हाेते.

२०५ जणांचा ताफा
चित्रीकरणासाठी मनोजसह ८० जणांची टीम साेमवारी सकाळी ११ वाजता विमानाने शहरात आली. मंगळवारी शूटिंग करून बुधवारी पहाटे सहा वाजताच ते मुंबईला रवाना झाले. अवघ्या दोन मिनिटांच्या शॉटसाठी दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत काम चालले. या शॉटमध्ये दिसणारे प्रवासी औरंगाबादचे १२५ एक्स्ट्रा कलाकार किशोर निकम यांच्या कंपनीने पुरवले. त्यांच्या हातात दिसणाऱ्या २०० बॅगा किरायाने आणल्या होत्या. फाइव्हस्टार हॉटेलात मुक्काम, कार, जेवण आदीतून शहरात एक-दाेन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली.

औरंगाबादेत आणखी तीन शूटिंग हाेणार
औरंगाबादमध्ये भरपूर क्षमता आहे. मनाेज यांच्या चित्रीकरणाची माहिती समजताच आणखी एक चित्रपट, वेबसिरीज आणि आणखी एका चित्रीकरणाचे काम शहरात आले आहे. पुढील महिन्यात याबाबत अंतिम निर्णय होईल. अशा चित्रीकरणातून औरंगाबादची ब्रँडिंग होईल. शहराचे नाव जगात जाऊन मोठी उलाढाल होते. - किशोर निकम, संचालक, एट अवर्स

बातम्या आणखी आहेत...