आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हत्यारे मागवल्याची कबुली:ऑनलाइन 600-800 रुपयांत तलवार मागवून 3 हजारांत विक्री, 37 पैकी 10 तलवारी मागवणारा मजूर अटकेत

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गल्लोगल्ली अल्पशिक्षित तरुणांनी मांडला तलवार विक्रीचा बाजार

चार दिवसांपूर्वी कुरिअरद्वारे तलवारींच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस आले होते. यात सात जणांनी ३७ तलवारी व एक कुकरी मागवली होती. त्यापैकी खोटे नाव देऊन दहा तलवारी व एक कुकरी मागवणाऱ्याचा शोध घेत क्रांती चौक पोलिसांनी रविवारी अटक केली. जयसिंगपुऱ्यात राहणाऱ्या अबरार शेख शेख जमील ऊर्फ शाहरुख (२१) याने या तलवारी शहरात विकण्यासाठी मागवल्या होत्या. धक्कादायक म्हणजे, पोलिसांच्या या कारवाईपूर्वीच त्याने पाच तलवारी मागवल्या होत्या. त्यामुळे आता गल्लोगल्ली अल्पशिक्षित तरुणांनी ऑनलाइन तलवारी मागवून विकण्याचा बाजार मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ यूट्युबवर विक्रेत्याचा क्रमांक मिळवून ऑर्डर करून राजरोस हा प्रकार सुरू झाला आहे. त्यापैकी त्याच्याकडून तलवारी विकत घेतलेल्या तिघांना अटक करत पोलिसांनी आणखी तीन तलवारी जप्त केल्या.

३० मार्च रोजी पोलिसांना निराला बाजार येथील डीटीडीसी या कुरिअर कंपनीच्या कार्यालयात अवैधरीत्या धारधार तलवारी आल्या असल्याची माहिती मिळाली होती. सकाळी क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांनी छापा टाकून तेथून ३७ तलवारी, एक कुकरी जप्त केली. यात व्यवस्थापकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी या तलवारी मागवलेल्या सात जणांचा शोध सुरू केला. यात एका छायाचित्रकारासह गॅरेजवर काम करणाऱ्या मजुराला अटक करण्यात आली होती. त्यानंतर शहरात सर्वाधिक दहा तलवारी मागवणाऱ्याचे नाव मात्र खोटे व अर्धवट होते. त्याने नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावरून शोध सुरू केला असता अबरारने मित्राच्या नावावर सीम कार्ड खरेदी करून कुरिअर कंपनीला क्रमांक दिला होता.

पोलिस मित्रांपर्यंत पोहोचल्यानंतर हे समजताच त्यांनी अबरारला अटक केली. पोलिसांनी ३० मार्चच्या कारवाईत जप्त केलेल्या साठ्या व्यतिरीक्त अबरारने यापूर्वीच डीटीडीसीच्याच मार्फत पाच तलवारी विकत घेतल्या होत्या. त्यापैकी तीन विकत घेतलेल्या शेख उबेद शेख नजीर (२०, रा. जयसिंगपुरा रोड), दानिश खान अब्दुल समद खान (२०, रा. बिस्मिल्लानगर, हर्सूल) यांच्याकडून प्रत्येकी एक, तर अबरारच्या घरातून एक अशा तीन तलवारी पोलिस उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांनी जप्त केल्या.

२०२१ च्या रॅकेटमध्ये मुख्य आरोपी होता आइस्क्रीम विक्रेता
बहुतांश आरोपी अल्पशिक्षित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये आतापर्यंत पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी छायाचित्रकारा व्यतिरिक्त इतर सर्व आरोपी अल्पशिक्षित व मजुरी चेकाम करतात. यूट्युब, फेसबुकवर फ्लॅश होणाऱ्या जाहिरातींमध्ये पंजाबमधील तलवार विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक असतात. त्यांना ऑनलाइन पैसे दिल्यानंतर ते तुमच्या पत्त्यावर पोहोच करतात. अबरार काच बसवण्याचे काम करतो. मागील अनेक महिन्यांपासून तो ६०० ते ८०० रुपयांपर्यंत तलवारी, कुकरी विकत घेऊन शहरात ३ ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत तलवारी विकल्याची धक्कादायक बाब समोर आली. २०२१ मध्ये तलवारीच्या रॅकेटमध्ये मुख्य आरोपी आईसक्रीम विक्रेता होता.

कुरिअर कंपनीला नोटीस
तलवारींच्या तस्करीमध्ये सहकार्य करणाऱ्या डीटीडीसी कंपनीला क्रांती चौक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. परंतु पाच दिवस उलटूनही कुरिअर कंपनीने उत्तर दिले नाही. नोटीसमध्ये कंपनीच्या प्रक्रिया, त्यांच्या पंजाबमधील शाखा या तलवारी आलेल्या प्रक्रियेशी संबंधित अधिकारी कर्मचारी व एकूण पंजाबमधून त्या नेमक्या कशा व कुठून आल्या, या विषयी देखील पोलिसांनी विचारणा केली आहे. त्यानंतर कुरिअर कंपनीवर कडक कारवाई करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...