आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वपूर्ण प्रकल्प:शहरात लवकरच 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वाहनांवर राहणार नजर, नियम मोडणाऱ्यांना दंड

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेफ सिटी प्रकल्पांतर्गत आता थेट वाहनांची नंबर प्लेट स्पष्टपणे कैद करणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत. प्राथमिक स्तरावर त्याचे नियोजन सुरू असून तीन महिन्यांमध्ये शहरात विविध ठिकाणी असे शंभर कॅमेरे बसवले जातील. त्यासाठी पोलिस विभागाने स्मार्ट सिटीकडून ठिकाणे मागवले असून पाहणी सुरू असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले.

शहरातील वाहतूक कोंडी, मोर्चा, दंगल किंवा इतर आणीबाणीच्या परिस्थितीत पोलिस यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचावी यासाठी शहरातील ४१८ ठिकाणी ७०० सीसीटीव्ही बसवण्याचा उपक्रम वर्षभरापूर्वी हाती घेतला. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतून १७६ कोटींचा निधी यासाठी देण्यात आला. महानगरपालिकेसह पोलिस आयुक्तालयात याचे स्वतंत्र कमांड कंट्रोल सेंटर उभारले. मास्टर सिस्टिम इंटिग्रेडर (एमएसआय) प्रकल्पांतर्गत बसवलेल्या कॅमेऱ्यांते सातशेपैकी सहाशे फिक्स कॅमेरे असून शंभर फिरते कॅमेरे आहेत. त्यांना पीटीझेड कॅमेरे म्हणतात. आयुक्तालयाच्या कंट्रोल सेंटरमध्ये यासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस विभागाकडून केलेल्या सूचनेनुसार यापूर्वीच ४१८ जंक्शनवर कॅमेरे बसवले आहेत. यासाठी ४१८ खांब उभारून सुमारे १५० किलोमीटरचे केबल टाकले आहे. आता याच खांबावर एनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नायझेशन) प्रणालीचे कॅमेरे बसवले जातील. याचे कंत्राट स्वतंत्र कंपनीला दिले आहे.

कसे काम करणार
{नव्या प्रणालीमुळे वाहनचालकाचे तीन प्रकारे छायाचित्र हे कॅमेरे स्वत:हून कैद करतील.
{एक केवळ नंबर प्लेट, त्यानंतर लाँग शॉटमध्ये मागील ठिकाणासह दुचाकी व एक चेहरा कैद करण्याचा प्रयत्न करेल.
{यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड ठाेठावण्यात येणार आहे. गुन्ह्याशी संबंधित वाहनांची माहिती सहज उपलब्ध होईल.
{शहराच्या प्रवेशमार्गांसह १०० जागा निश्चित झाल्या आहेत. त्यांची पुन्हा चाचपणी करण्यासाठी पोलिसांना विचारणा करण्यात आल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...