आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी, दृष्टी धूसर झाल्याची समस्या तसेच डोक्याचा आकार वाढलेल्या एका चार वर्षीय बालिकेवर मेंदूची अत्यंत क्लिष्ट आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात यशस्वीरित्या करण्यात आली. जगात अशाप्रकारच्या समस्येने केवळ 100 रुग्ण ग्रस्त असून त्यापैकीच एक ही बालिका होती. भारतात आजवर अशा केवळ तीनच शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यापैकी एक एमजीएम रुग्णालयातील न्यूरोसर्जन विभागात करण्यात आल्याची माहिती न्यूरोसर्जन डॉ. इश्तियाक अन्सारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
बीड जिल्ह्यातील शहाजनपूर येथील रहिवासी असलेल्या चारवर्षीय बालिकेला साधारणपणे महिनाभरापासून तीव्र डोकेदुखीची समस्या होती. तिची दृष्टीही धूसर झाली होती. आणि डोक्याचा आकारही वाढला होता. त्यामुळे चिंतित झालेल्या पालकांनी बालिकेला एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागात आणले होते. दरम्यान, तिच्या एमआरआय चाचणीतून मेंदूच्या अत्यंत खोलवर असलेल्या इंट्राव्हॅट्रीक्यूलर भागात ब्रेन ट्यूमर असल्याचे दिसून आले.
शस्त्रक्रियेचे नियोजन
बालिकेच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर बालिकेवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले. ट्यूमर मायक्रोस्कोप आणि न्यूरो मायक्रोसर्जिकल तंत्राच्या सहाय्याने कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ट्यूमर काढण्यात आला.
ट्यूमरच्या 100 केसेस
या मुलीला आता कोणत्याही वेदना किंवा अन्य जोखीम नसल्याचे तपासून डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर आलेल्या हिस्टोपॅथॉलॉजी अहवालानुसार, बालिकेला मायक्सॉइड ग्लिओन्युरोनल ट्यूमर होता. तो सेप्टम पेलुसिडमपासून उद्भवणाऱ्या इंट्राव्हेंट्रिक्युलर ट्यूमरशी संबधीत असतो. इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीने सेप्टम पेलुसिडमपासून उद्भवलेल्या मायक्सॉइड ग्लिओन्युरोनल ट्यूमरच्या निदानाची पुष्टी केली. जगात या ट्यूमरच्या केवळ 100 केसेस असून भारतातील तिसरी केस आहे.
ट्यूमर संशोधनसाठी प्रयोगशाळेत
बालिकेच्या मेंदूतून काढलेले हे ट्यूमर अभ्यास आणि पुढील संशोधनसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे डॉ. अन्सारी यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया डॉ. इश्तियाक अन्सारी यांच्या नेतृत्वात डॉ. सुशील शिंदे, अनेस्थेशिया डॉ. केळकर, डॉ. सरीता कुलकर्णी, डॉ. भाले यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. याबद्दल महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.