आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध कोरोनाविरुद्ध:हिंगोलीत 100, तर बीड जिल्ह्यात 90 टक्के लसीकरण; जालन्यामध्ये कोविन अॅप बंद

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी 262 जणांनी घेतली लस

मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात शंभर टक्के, बीड जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण झाले, तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी प्रतिसाद मिळाला. मात्र जिल्ह्यात कुठेही लसीकरणानंतर रिॲक्शन झाल्याचे प्रकार घडले नाहीत. जालना येथे कोविन अॅप चालले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जालना येथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

मराठवाडयात कोविड लसीकरणासाठी ३९ ठिकाणे निवडण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने शासकीय रुग्णालयाचा समावेश होता. या शिवाय सोयीच्या ठिकाणी लसीकरण ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी साडेदहा वाजता लसीकरणाचे उद्घाटन केल्यानंतर मराठवाड्यात लसीकरणाला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.दरम्यान, लसीकरण केंद्रावर आज सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी फुलांचे हार तर काही ठिकाणी लसीकरण केंद्र फुग्यांनी सजवले होते. सकाळी अकरा वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण करण्यात आले. केवळ हिंगोली जिल्ह्यामध्ये २ केंद्रांवर २०० जणांना लसीकरण करण्यात आले. शंभर टक्के लसीकरण करून हिंगोली जिल्ह्याने राज्यात प्रथम, तर बीडने ९० लसीकरण करून पाचवा क्रमांक मिळविला आहे.

परभणी : चार केंद्रांवर ३९४ जणांनी घेतली लस
परभणी जिल्ह्यात चार केंद्रांवर ३९१ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. आॅर्थोपेडिक हॉस्पिटल येथे डॉ.दुर्गादास पांडे यांना सकाळी साडेअकरा वाजता पहिली लस देण्यात आली.

बीड : पहिल्याच दिवशी ४९ जणांनी फिरवली पाठ
जिल्ह्यात शनिवारी उत्साहात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ४५१ जणांना पाच केंद्रांवरून लस दिली गेली, तर ४९ जणांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. बीडमध्ये आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर हे लस घेणारे पहिले लाभार्थी ठरले. दरम्यान, अंबाजोगाईत नियोजन कोलमडल्याने लसीकरण सुरू होण्यास उशीर झाला.

जिल्ह्यात शनिवारी बीड जिल्हा रुग्णालय, परळी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई उपजिल्हा रुग्णालय, आष्टी ग्रामीण रुग्णालय या पाच ठिकाणांहून कोरोना प्रतिबंधक लसीचे लॉन्चिंग झाले. प्रत्येक केंद्रावर शंभर याप्रमाणे पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी लस देण्याचे नियोजन केले गेले होते. मात्र, ४९ जणांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने ४५१ जणांना पहिल्या दिवशी लस दिली गेली. यामध्ये बीडमध्ये ९३, आष्टी ९६, अंबाजोगाईत ९२, गेवराईत ७० आणि परळीत १०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी बीडमध्ये डॉ.अनुराग पांगरीकर यांना लस देत उद््घाटन झाले. सीईओ अजित कुंभार, सीएस सूर्यकांत गिते, डीएचओ डॉ. आर. बी. पवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, अंबाजोगाईत स्वाराती रुग्णालयात नियोजन कोलमडल्याने कार्यक्रमास उशीर झाला. इथे उद््घाटनाला लस घेण्यासाठी कर्मचारीच वेळेवर मिळाले नाहीत. त्यामुळे आग्रह करून तीन कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी तयार केले गेले. नंतर मात्र दिवसभरात ९२ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात कुठेही कुणालाही काही त्रास झालेला नाही.

नांदेड : आरोग्य समुपदेशक सुवर्णकार यांना पहिला मान
पाचही केंद्रावर २६२ आरोग्य रक्षकांना लस देण्यात आली. बहुतांश जणांनी दुसऱ्या टप्प्यात लस घेण्यास पसंती दर्शवली. जिल्हा सामन्य रुग्णालयाच्या केंद्रावर पहिली लस आरोग्य समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांना मिळाला.

लातूर : जिल्ह्यात ३७९ जणांना लसीकरण
जिल्ह्यात सहा ठिकाणी ६०० पैकी ३७९ जणांना लस देण्यात आली. उदगीर रुग्णालयात ७८, औसा ग्रामीण रुग्णालयात ७०, अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात ५८, मुरुड ग्रामीण रुग्णालयात ६५, लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४८ तर महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेच्या केंद्रावर ६० जणांनी लस घेतली.

उस्मानाबाद : डॉ. सचिन देशमुख ठरले प्रथम मानकरी
जिल्ह्यात ३ केंद्रांवर ३०० पैकी २१४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. जिल्हा रुग्णालयात प्रथम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख यांना अधिपरिचारिका अर्चना डोके, सीमा गायकवाड यांनी लस दिली. लसीसाठी आलेल्यांना सुरक्षित अंतराने बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

हिंगोली : टाळ्यांच्या कडकडाटात शुभारंभ
शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ डॉ. दीपक मोरे यांना अधिपरिचारिका कलावती राठोड यांनी पहिली लस दिली. हिंगोलीत १००, तर कळमनुरीत १०० जणांनी लस घेतली. हिंगोलीत अधिपरिचारिका ज्योती पवार तर कळमनुरीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रौफ यांना शेवटचे लसीकरण करण्यात आले.

जालना : पंतप्रधानांचा कर्मचाऱ्यांशी संवाद
येथील जिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ११.२० वाजता सर्वप्रथम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांना लस टोचण्यात आली. तर सर्वात शेवटी सायंकाळी ६ वाजता १०८ रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक मनोज जाधव यांना लस देण्यात आली. दरम्यान, परतूरमध्ये सर्वाधिक ८२, अंबड ७९, भोकरदन ६३ तर जालन्यात ६३ असे एकूण २८७ लाभार्थींचे लसीकरण झाले. कोविन अॅप न चालल्यामुळे ऑफलाइन यादीत नावे पाहूनच लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जालना येथील आरोग्य कर्मचारी-अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...