आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पडताळणी:वाहनचालकांच्या चारित्र्य प्रमाणपत्राबाबत 100 टक्के शाळा अनभिज्ञ

औरंगाबाद / विद्या गावंडे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळांमधील वाहन समित्यांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि व्हॅनचालकांना पोलिसांनी दिलेेल्या चारित्र्य प्रमाणपत्रांची नोंद असावी, अशा पोलिसांच्या सूचना आहेत. मात्र, याबाबत शहरातील १०० टक्के शाळा अनभिज्ञ असून, ६० टक्के शाळांकडे रिक्षा, व्हॅनचालकांच्या वाहन परवान्याची नाेंदही नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानादेखील शाळा गंभीर नसल्याचे दिसून आले. दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने शहरातील नामांकित १० शाळांच्या केलेल्या पाहणीत हा अजब प्रकार समाेर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना पाहता. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीचा विषय बनला आहे. रिक्षाचालकाने तीन शालेय मुलींसोबत विकृत चाळे केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनांमुळे खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळा प्रशासन जागे झाले असून, पोलिसांनी सर्व शाळांना विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांची संपूर्ण माहिती, चारित्र्य प्रमाणपत्र आणि वाहन परवान्याची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात शाळांमधील परिवहन समितीची काय स्थिती आहे, किती शाळांमध्ये परिवहन समिती प्रत्यक्ष कार्यरत आहे, त्यांची नियमित बैठक होते का, शाळांतील किती विद्यार्थी वाहनाने ये-जा करतात याची माहिती शाळांना आहे का, किती शाळांकडे वाहनचालकांच्या लायसन्सची नोंद आहे, रिक्षा किंवा व्हॅनचालकांचे पोलिस ठाण्याकडून मिळालेले कॅरेक्टर सर्टिफिकेट शाळांकडे जमा आहेत का, आदी बाबी जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने निवडक १० शाळांकडे विचारणा केली असता, सर्वच शाळा रिक्षा, व्हॅनचालकांचे पाेलिसांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र कार्यालयात असायला हवे, याबाबत अनभिज्ञ असल्याचे आढळून आले.

शाळांच्या सर्वेक्षणाची आकडेवारी {१० टक्के शाळांमध्ये समिती नाही {९० टक्के शाळांमध्ये परिवहन समिती {८० टक्के शाळांमध्ये परिवहन समितीची नावालाच हाेते बैठक {६० टक्के शाळांकडे वाहनचालकांच्या लायसन्सची नोंद नाही {८० टक्के शाळांमधील विद्यार्थी व्हॅन, रिक्षा, बसने येतात याची नाेंद {१०० टक्के शाळा वाहनचालकांकडे चारित्र्य प्रमाणपत्र असावे याबाबत अनभिज्ञ

समितीमध्ये यांचा असावा समावेश या समितीच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक-पालक संघाचा एक प्रतिनिधी, वाहतूक निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक, बस कंत्राटदारांचा प्रतिनिधी, स्थानिक प्रतिनिधींचा समावेश असावा.

शाळांना पुन्हा नवे सूचना पत्र विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांनी नियमित बैठका घेणे, तसेच रिक्षा आणि व्हॅनचालकांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे. शहरात घडणाऱ्या घटना पाहता शिक्षण विभाग पुन्हा नव्याने शाळांना एक नवे सूचना पत्र पाठवणार आहे. एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...