आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाचा परिणाम:कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 100 टन आवक; आवक घटल्याने गव्हाचे भाव वाढले

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

उन्हाळा सुरू होताच अनेक जण वर्षभराचे गहू, डाळी भरून ठेवतात. मात्र, युद्धामुळे रशियातून भारतात येणाऱ्या गव्हाची आवक बंद झाली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात अवकाळी पावसाने गव्हाचे नुकसान झाले. यामुळे महाराष्ट्रातील नवीन गव्हाला चांगला भाव मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दरराेज १०० टन गव्हाची आवक होत आहे.

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील वर्षी गव्हाचे भाव १८०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. यंदा २२०० ते २४५० रुपये झाले आहेत. व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून २३०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करत आहेत. आटा मिलसाठी २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल खरेदी होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मशीन क्लीन गव्हाचे दर २७०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. ४९६ जातीचा गहू २७०० ते २८०० रुपये, मोहन वंडर २७०० ते २८०० रुपये, अजित २७०० ते २९०० रुपये तर मध्य प्रदेशातील शरबती गहू २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.

गव्हाच्या भाववाढीची ही आहेत कारणे
जगात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन रशियात होते. मात्र, युक्रेन-रशिया युद्ध सुरू असल्याने रशियातून भारतात होणारी आवक बंद आहे. तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात पावसामुळे गव्हाचे नुकसान झाले आहे. यंदा जास्त क्षेत्रावर पेरणी होऊनही उतारा कमी झाल्याने बाजारात आवक कमी आहे. मध्य प्रदेशातील गहू बांगलादेशात निर्यात होत असल्याने भाव वाढले आहेत.

बाहेरच्या देशात निर्यात अन् आवकही कमी
मध्य प्रदेशातून बांगलादेशात गव्हाची निर्यात सुरू झाली आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या गव्हाची आवक कमी आहे. दुसरीकडे रशियातूनही आवक बंद आहे. आपल्याकडील गव्हाचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. यामुळे दरवाढ झाली. - जगदीश भंडारी, दुर्गा राइस अँड पल्सेस, जाधववाडी

बातम्या आणखी आहेत...