आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या जॉर्जियाच्या पहिलवानाने जिंकल्या 100 कुस्त्या

औरंगाबाद / गिरीश काळेकर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दंगल, सुलतान चित्रपटांमुळे ग्लॅमर प्राप्त झालेल्या कुस्तीचे प्रेक्षक पाच वर्षांत वाढले आहेत. हर्सूल येथील ग्रामदेवी हरसिद्धी मातेच्या यात्रेत विविध देशांतून आलेल्या पहिलवानांची कुस्ती आकर्षणाचे केंद्र आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जॉर्जियाचा पहिलवान टेडो इबॅनॉइडझे आला आहे. त्याने इकॉनाॅमिक्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. आतापर्यंत त्याने १०० कुस्त्या जिंकल्या आहेत. दररोज २ लिटर ज्यूस, १ लिटर दुधासह १ कोंबडीही तो फस्त करतो. दिव्य मराठीने इबॅनॉइडझेशी संवाद साधला, अन् रोमांचक गोष्टी जाणून घेतल्या. यात्रेत बुधवारी(९ नोव्हेंबर) कुस्त्यांची दंगल होणार आहे. मंदिराचे विश्वस्त नारायण सूर म्हणाले, १३ व्या शतकातील हे मंदिर आहे. यात्रेची परंपराही जुनीच आहे. १०० वर्षांपूर्वी रेवड्या, नारळाच्या बक्षिसावर कुस्ती रंगायची. आता काळ बदलला आहे. हर्सूलचेही शहरीकरण झाल्याने पैशांवर कुस्ती लावली जाते. दंगलीत साधारणत: ७५० कुस्त्या होतात. एक पहिलवान किमान ३ ते ४ कुस्त्या खेळतो. पाच वर्षे वयोगटातील पहिलवान यामध्ये सहभागी होतात.

मूळ जॉर्जियातील असलेला आणि सध्या चंदीगडमध्ये असलेला टेडो इबॅनॉइडझे याची कुस्ती पाहणे आकर्षण ठरेल. इबॅनॉइडझे सांगत होता, वयाच्या ५ व्या वर्षांपासून मी कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. माझे काकासुद्धा रेसलर होते. जॉर्जियामध्ये मित्रमंडळी रेसलर (कुस्ती) खेळात आल्यामुळे मलाही यात आवड निर्माण झाली. इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेत असतानाच रेसलिंगचेही प्रशिक्षण घेत होतो.

प्रशिक्षक बनून अनेक कुस्तीपटू घडवण्याचे स्वप्न
टेडो इबॅनॉइडझेचे वजन १०० किलो आहे. ५ फूट ९ इंच उंची आहे. तो दररोज जिम न करता एक दिवआड जिममध्ये व्यायाम करतो. व्यायाम सर्वांसाठी आरोग्यदायी आहे. कुस्तीव्यतिरिक्त फुटबॉल, बास्केटबॉल या खेळांचीही त्याला आवड आहे. भविष्यात त्याला उत्तम दर्जाचा रेसलिंग कोच बनून अनेकांना प्रशिक्षित करण्याचे आपले स्वप्न असल्याचे टेडो म्हणाला.

चंदीगड रेसलरसाठी चांगले शहर
जॉर्जिया छोटे शहर आहे. पण या ठिकाणी रेसलर मोठ्या प्रमाणात आहेत. स्पर्धाही बऱ्याच होतात. भारतात चंदीगड हे कुस्तीगिरांचे शहर आहे. आमचे काही मित्र या ठिकाणी आले. त्यापाठोपाठ मीसुद्धा खेळण्यासाठी आलो. पाच वर्षांपासून चंदीगडमध्ये राहत आहे. इथे नवे डावपेचही शिकलो.

विविध ठिकाणी स्पर्धेत बाजी
आतापर्यंत १०० मॅचेस खेळल्या आहेत. यात जम्मू, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जळगाव तसेच विदेशात इटली, क्रेमानिया, तिटोआ, सेंट सरबेन, तुर्की, इराण आदी ठिकाणी खेळलाे आहे. त्यामध्ये चॅम्पियनशिपमध्ये एक ब्राँझपदक तसेच गदा मिळवली.

बातम्या आणखी आहेत...