आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्ग ड्रीम प्रोजेक्ट होता. याच समृद्धीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातील जवळीक वाढली. किमान १००० कोटींची समृद्धी महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधीच्या माध्यमातून शिंदेंनी औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना दिली. त्यामुळे बंडात ते त्यांच्या गळाला लागले, असे स्पष्ट दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिंदेंशी सर्वाधिक जवळीक असलेले आमदार म्हणून आमदार संजय शिरसाट यांची ओळख आहे. २०१९ मध्ये त्यांना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. निवडून आल्यावर त्यांना शिंदे यांनी बीड बायपाससाठी ३७१, सातारा देवळाई ड्रेनेज २००, रस्त्यांसाठी १०० कोटी दिले. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात रस्त्यांसाठी निधी हवा आहे, असे कळल्यावर शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेत त्यांना तो मिळवून दिला.
वैजापूर नगरपालिकेला ३० कोटी : २०१९मध्ये शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री असताना रमेश बोरनारे तालुकाप्रमुख होते. तेव्हापासून त्यांच्यात चांगले संबंध तयार झाले. बोरनारेंना उमेदवारी देण्यात शिंदेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी वैजापूर नगरपालिकेला ३० कोटींचा निधी मिळवून दिला. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा निधी देण्यात आला. पंधरा एप्रिल रोजी वैजापूर बाजारपेठेतील रस्त्याच्या भूमिपूजनात बोरनारेंशी शिंदे यांचे सख्य अधिक लक्षात आले. आठ जूनला विक्रमी सभा आणि २१ जूनला आमदार फुटले : आठ जून रोजी उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला सभा झाली. त्यात सभेची गर्दी दिल्लीच्या तख्ताला धडकी भरवणारी असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. प्रत्यक्षात सभेनंतर १३ दिवसांत शिवसेनेलाच धडकी भरावे असे बंड झाले.
भुमरेंच्या जाण्याने सर्वांनाच धक्का : रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या शिंदेंसोबत जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. मंत्रिपद मिळाल्यावर भुमरेच शिवसेनेने मला कसे सर्व काही दिले, याचा उल्लेख वारंवार भाषणात करत होते. तरीही ते बंडात सामील झाल्याने शिवसैनिकांत त्यांच्याविषयी नाराजीचा सूर उमटला आहे.
जिकडे सत्ता तिकडे सत्तार काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सत्तार कुठे जाणार याची चर्चा सुरू होती. रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधामुळे ते भाजपत जाणार हे निश्चित झाले होते. मात्र फडणवीसांच्या सल्ल्यानेच ते शिवसेनेत गेले. त्यामुळे सत्तार शिंदेंसोबत गेल्याचा धक्का शिवसेनेच्या नेत्यांना बसलेला नाही. जिकडे सत्ता तिकडे सत्तार, असे समीकरण असल्याचे या नेत्यांनी सांगितले. १९९६ मध्ये शिवसेनेकडून खासदार झालेले प्रदीप जैस्वाल एकदा अपक्ष आमदार झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडणे नवीन गोष्ट नाही, अशी चर्चा भाजप-सेनेच्या वर्तुळात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.