आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:गुजरातच्या कंपनीचे 1 हजार कर्मचारी घरोघरी करताहेत मालमत्तांचे सर्वेक्षण ; 10 कोटी रुपयांचा खर्च

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटतर्फे शहरातील मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण करण्यात येत आहे. ड्रोन आणि सॅटेलाइटवरून घेतलेल्या छायाचित्रांवरून तीन लाख मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, या तीन लाख इमारती असून यात अनेक अपार्टमेंट आणि व्यावसायिक इमारती आहेत. आता घरोघरी जाऊन मालमत्तांची नोंद करणे सुरू असून १ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील एमएक्स इन्फो कंपनीला सुमारे १० कोटी रुपयांत हे काम दिले आहे. शहरातील प्रभाग ३ व ४ मध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे. जीआयएस तंत्रज्ञानाने शहरातील रस्ते, पाइपलाइन इत्यादी विविध घटकांचा मिळून ३०० स्तरीय नकाशा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी ड्रोन कॅमेरा, सॅटेलाइट आणि प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. यातील ड्रोन आणि सॅटेलाइट सर्वेक्षण आधीच पूर्ण झाले आहे. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद येथून सॅटेलाइट नकाशा प्राप्त झाला आहे. या दोन तंत्रज्ञानाद्वारे मिळवण्यात आलेल्या माहितीतून नकाशा तयार करून भौतिक सर्वेक्षणाद्वारे या नकाशाची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच मालमत्तांची मालकी नोंदवली जाणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे शहरातील छोट्या-मोठ्या सर्व मालमत्तांचा युनिक जीआयएस आयडी तयार होणार आहे. मनपा व स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांकडून इंटिग्रेटेड ऑपरेशन कमांड आणि कंट्रोल सेंटर येथून या सर्वेक्षणाचे ट्रॅकिंग सुरू आहे. जुलैत हे काम पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी दिली. घरांचे मोजमाप करणार : मालमत्ता कर लावण्यासाठी घराचे मोजमाप केले जाईल. विद्युत मीटर क्रमांक, आधार कार्ड, पॅन नंबर, मोबाइल क्रमांक, नळ कनेक्शनची नोंद केली जाईल. या शिवाय मालमत्तेचे बांधकाम क्षेत्रफळ, पहिला, दुसरा, तिसरा मजला याप्रमाणे नोंदणी केली जाईल. त्यामुळे मालमत्ता कराची पुनरआकारणी होईल. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयकार्ड व ड्रेसकोड देण्यात येणार आहे.

शहरातील अडीचपैकी दोन लाख मालमत्ताधारक भरतात कर शहराचा एकूण परिसर १७० चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १३५ चौरस किलोमीटर जागेचे ड्रोनद्वारे फोटो काढण्यात आले. शहरात पाच लाखांपेक्षा अधिक घरे असतील. मात्र, मनपाकडे २ लाख ५० हजार मालमत्तांचीच नोंद आहे. त्यापैकी दोन लाख मालमत्ताधारक कर भरतात. या मॅपिंगनंतर शहरात नेमक्या किती मालमत्ता आहेत हे समोर येईल.

बातम्या आणखी आहेत...