आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा समाजातील महिला व पुरुषांना उद्योग-व्यवसायासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातर्फे व्यक्तिगत कर्ज लाभाची योजना लागू केली आहे. यातून मराठवाड्यातील १४४५ महिलांना १०५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. इंटरप्रायजेस, फळ भाजीपाला विक्री, स्मॉल मॉल, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, अन्न प्रक्रिया उद्योग, पशुखाद्य उद्योग असे विविध व्यवसाय त्यांनी सुरू केले आहेत. यातून प्रतिव्यवसाय कमीत कमी दोन व जास्तीत जास्त सहा जणांना रोजगारही मिळाला आहे.
मराठा समाजातील भूमिहीन, कष्टकरी, अल्प व उच्चशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणी, शेतकरी महिला, शेतकरी गटांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज देऊन त्यांना पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवण्यासाठी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना झाली आहे. वैयक्तिक, गट प्रकल्प व्याज परतावा, अशा दोन कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी महामंडळावर आहे. व्यक्तिगत प्रति उद्योग, व्यवसायासाठी १० लाख रुपयांचे कर्ज देण्याचे धोरण होते. त्यात बदल करून आता १५ लाख रुपये आणि गटासाठी २५ ते ४५ लाखांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. बँक कर्ज देतात तर व्याजाचा भार महामंडळ उचलते. या माध्यमातून उद्योग व व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.
कर्ज घेण्यात पुरुष लाभार्थी अग्रेसर : महिला आणि पुरुष मिळून १७ हजार ४०४ जणांनी लाभ घेण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी १५ हजार ९५९ जणांना १ हजार ९७ कोटी रुपये कर्ज मंजूर झाले. पुरुषांच्या तुलनेत १४४५ महिलांचा समावेश नगण्य आहे.
दुग्ध प्रक्रिया करून फूड उद्योगाची उभारणी केली मी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून तीन लाख रुपये कर्ज घेऊन दुग्ध प्रक्रिया, फूड उद्योग सुरू केला आहे. दही व लस्सी पॅकिंग करून विक्री केली जाते. दोन महिलांना रोजगारही दिला आहे. व्याज महामंडळ भरत असल्याने आम्हाला चांगला फायदा होत आहे. प्राची शिंदे, लाभार्थी महिला.
व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा व्याज परतावा योजना चांगली असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. शून्यातून आज अनेक महिला लाभार्थींनी विविध व्यवसाय सुरू करून लखपती बनल्या आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम दिले आहे. यामध्ये कल्याणी पवार यांनी लेडीज टेलर, पूजा तांगडेंनी जनरल स्टोअर्स, वृषाली पवारने स्मॉल मॉल सुरू केला आहे. फूड प्रोसेसिंग, प्रक्रिया उद्योग आदींच्या माध्यमातून महिला चांगली प्रगती करत आहेत. पूजा तांबेकर, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब, आर्थिक विकास महामंडळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.