आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टमी पूजनाचा उत्साह:बंगाली भक्तांनी 9000 खर्चून मुंबईहून आणलेले 108 नीलकमल देवीला अर्पण रोशनी शिंपी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे तीन दिवसांचा नवरात्रोत्सव १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान साजरा करण्यात आला. बीड बायपास येथील रेशम लॉन्सवर झालेल्या कार्यक्रमात ३ दिवसांत ६ होम करण्यात आले. १०८ औषधी वनस्पतींची आहुती देऊन वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंगाली समाजातील भक्तांतर्फेही जालना रोडवरील सागर लॉन्समध्ये आयोजित दुर्गाेत्सवात १०८ नीलकमलांनी देवीची पूजा करण्यात आली. ही फुले औरंगाबादेत मिळत नसल्याने खास मुंबईहून मागवण्यात आली. त्यासाठी नऊ हजार रुपये खर्च करण्यात आला.

नवरात्रीतील आठवा दिवस सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी विविध मंदिरांत, सार्वजनिक मंडळात होम पूजाविधी झाल. पण, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बंगाली असोसिएशनचे अष्टमी सोहळे विशेष लक्षणीय ठरले. बंगाली असोसिएशनच्या मते अष्टमीच्या पूजेला पौराणिक संदर्भ आहे. विजयासाठी राम-रावणाने देवी चंडीला होम करण्याचे ठरवले. देवी ज्याला आशीर्वाद देईल तो विजयी ठरेल. रामाने पूजा करण्यासाठी १०८ नीलकमल मिळवले. मात्र, रावणाने मायाजाल गुंफत त्यातील एक कमळ कमी केले. पूजेत एक कमळ कमी पडले. तेव्हा रामाने स्वत:चा डोळा देण्याचा निश्चय केला. ही भक्ती पाहून देवी प्रकट झाली व रामाला विजयाचा आशीर्वाद दिला, अशी अाख्यायिका आहे. अष्टमीचा तो दिवस असल्याने चंडीपूजन करून बंगाली समाजाने देवीला १०८ निळे कमळ वाहिले.

४६ वर्षांपासूनची परंपरा
असोसिएशनचे सुमन घोष म्हणाले, ‘अष्टमीला मान असतो म्हणून गेल्या ४६ वर्षांपासून असोसिएशन मुंबईहून खास या पूजेसाठी नीलकमल फुले मागवते. याशिवाय आज रांगोळी स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धाही घेण्यात आल्या.’

महिलांचा आदर करा हाच आर्ट ऑफ लिव्हिंगचा संदेश
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या होमहवनात हरडा, बेहडा, वेलची, मुरुडशेंग, आवळा, ब्राह्मी, लवंग, विड्याचे पान, हळद, वाळा, बेल, तुळस, दूर्वा आणि सुपारी यासह १०८ वनस्पतींची आहुती देण्यात आली. या तीनदिवसीय कार्यक्रमात ६ हजार भाविकांनी हजेरी लावली. ध्यानधारणा, योगविधीही येथे करण्यात आले. गणपती होमाने सुरुवात झालेल्या या उत्सवात नवग्रह होम, वास्तू होम, रुद्र होम, सुदर्शन होम, चंडी होम करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे देशातील ३० शहरांत हा उत्सव साजरा करण्यात आला. औरंगाबादेत हेे पाचवे वर्ष होते. त्यासाठी बंगळुरूहून ब्रह्मचित्त स्वामी तसेच वेदपठण करणारे शिष्य आलेले होते. साध्वी नित्यबोधी म्हणाल्या, स्त्रीला शक्तिस्वरूप मानून तिची विविध रूप स्वीकारा, पत्नी, मुलगी, आई, बहीण अशा विविध रूपांतील स्त्रीचा आदर करा, असा संदेश यातून दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...