आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा परिणाम:दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडूनच; निकालावर होणार परिणाम

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शिक्षण विभागाकडून वेळेत निकाल लावण्याचे प्रयत्न

मागील एक महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणी विना शाळा-कॉलेज आणि पोस्टातच पडून आहेत. अजून तीन मेपर्यंत लॉकडाऊन राहाणार असल्यामुळे दहावी बारावीचा निकाल उशीरा शक्यता निर्माण झाली आहे.

एसएससी बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे परिस्थिती वेगळी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्तापर्यंत तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तीन मेनंतरही लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पेपर तपासून निकाल जाहीर करण्याचे मोठे आव्हान मंडळासमोर आहे.

निकाल वेळेत लागावा यासाठी पेपर तपासणीचे काम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी नेण्याची सूट दिली होती. पण, हा आदेश उशिरा जाहीर केल्यामुळे परीक्षकांना उत्तरपत्रिका घरी नेता आल्या नाहीत. ज्यांनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी नेल्या; त्यांना लॉकडाऊनमुळे त्या बोर्डात जमा करता आल्या नाही. दहावीच्या इतिहासाचा पेपर झाल्यानंतर लगेच संचारबंदी लागू झाल्याने या उत्तरपत्रिका पोस्टातच आडकून पडल्या. परीक्षकांनी उत्तरपत्रिका तपासल्यानंतर त्या नियामक व मुख्य नियमांकडे तपासणीसाठी जातात. पण, परीक्षकांकडेच उत्तरपत्रिका न पोहोचल्याने तपासणीचे काम राहीले असल्याचे परिक्षकांनी सांगितले.

विभागीय मंडळाच्या सूचना   

निकाल वेळेत लावण्यासाठी बोर्डाकडून प्रयत्न सुरु आहेत, यासाठी बोर्डाच्या सचिवांनी १८ एप्रिल रोजी सर्व समिक्षक व नियमकांना सूचना सूचना दिल्या आहेत. यात म्हटले की, समीक्षकांनी परीक्षकांकडून उत्तरपत्रिका जमा करुन तातडीने काम पुर्ण करावे. समीक्षणाचे काम झल्यानंतर काउंटर फाडून शंभरचे गठ्ठे करुन ठेवावेत, जेणेकरून सबमिशनच्या वेळी गर्दी होणार नाही. ज्या परीक्षकांनी उत्तरपत्रिका पोस्टऑफिसमधून घेतल्या नसतील, त्यांनी त्या तातडीने घेत लवकर तपासून समिक्षकाकडे जमा कराव्यात. सबमिशनबद्दल सूचना लॉकडाऊन संपल्यानंतर दिल्या जातील. एखाद्या ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती असल्यास तेथे या सूचनांचे पालन करणे बंधनकारक नाही, असे कळविण्यात आले आहे.

दहावीच्या इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका वगळून अन्य विषयांच्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडे पोहचल्या असून त्या तपासण्याचे काम सुरु आहे. इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पोहचवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे निकाल वेळेत लावण्यासाठी परीक्षक, नियामकांशी कायम संपर्क सुरु असून उत्तरपत्रिका तपासणीबाबत बोर्डाकडून पाठपुरावा सुरु आहे. निकाल वेळेत लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळा येऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...