आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलतिकीटात तारखांच्या क्रमामुळे घोळ!:हिंदीचा पेपर असल्याचे उशिराने आले लक्षात, परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहचले 20 मिनिटे लेट

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी अधिकची आसन व्यवस्था तर कधी केंद्रावर होणारी गैरसोय यामुळे बोर्डाच्या परीक्षेतील गोंधळ विद्यार्थी-पालकांसाठी काही नवीन नाहीत. हे नसे थोडके म्हणून की काय? बुधवारी चक्क बोर्डाने दिलेल्या हॉलतिकीटातील पेपरच्या तारखांच्या क्रमातील गोंधळामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले अन् हिंदचा पेपर हुकता हुकता राहिला. या प्रकारामुळे शहरातील दहा ते बारा परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वीस ते पंचवीस मििनटे उशीरा पोहचल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून केंद्रप्रमुखांच्या अधिकाराने त्यांने प्रवेश देण्यात आला. मात्र या सर्व प्रकारात वेळेत पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. २१ फेब्रुवारी पासून बारावीच्या तर २ मार्च पासून दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत.

या आधी बारावीच्या इंग्रजी पेपर दरम्यान शिक्षकांसाठीच्या मॉडल अ‌ॅन्सरमधील काही प्रश्नांची उत्तरे छापून आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तर बुधवार दि. ८ मार्च रोजी दहावीच्या हिंदी भाषा विषयाचा पेपर होता. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉलतिकीटावर पहिला पेपर मराठीचा २ तारखेला, त्यानंतर दुसरा पेपर हिंदीचा आठ तारखेला आणि तीसऱ्या क्रमांकावर इंग्रजीचा पेपर सहा तारखेला असे छापण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी धुलीवंदनची सुट्टी असल्याने आणि तारखांच्या क्रमातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

यामुळे बुधवारी अनेक विद्यार्थ्यांना हिंदीचा पेपर असल्याचे उशीरा माहित झाले. परीणामी, शहरातील दहा ते बारा परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वीस ते पंचवीस मिनिटे उशीरा पोहचले. हॉलतिकीटावरील वरखाली झालेल्या तारखांमुळे उशीर झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगीतले. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेत पेपर देण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे पेपर लिहिण्यासाठी असलेल्या वेळेत पेपर सोडवण्याची कसरत विद्यार्थ्यांना करावी लागली.

केंद्रप्रमुखांना अधिकार

''विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमाप्रमाणे निर्धारित वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एखाद्या कारणासाठी जर काही मिनिट विद्यार्थ्यांना उशीर झाला तर केंद्र प्रमुख त्यांच्या अधिकारात त्यांना प्रवेश देवू शकता. विद्यार्थी हित लक्षात घेवूनच हा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.'' - एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

बातम्या आणखी आहेत...