आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आसनव्यवस्थेचे नियोजन करताना शाळांना कसरत करावी लागली. मोठ्या शाळा वगळता शिक्षण मंडळाची तपासणी, उपकेंद्राचे नियोजन फसवे असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असा शिक्षण मंडळाचा दावा सरकारी शाळेतच फोल ठरल्याचे चित्र होते. अनेक केंद्रांवर वर्ग लहान असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. वर्गात धूळ होती. काही परीक्षा केंद्रांच्या परिसरात बांधकाम साहित्याच्या वाहनांची ये-जा सुरू होती. या वाहनांचा आवाज सहन करत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
दहावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिला पेपर मराठी, हिंदी, उर्दू या प्रथम भाषा विषयांचा होता. परीक्षेपूर्वी केंद्रांची तपासणी केल्याचेही मंडळाकडून सांगण्यात आले. अनेक केंद्रांवर अगदीच छोट्या वर्गखोल्या होत्या. पत्र्याचे वर्ग, फॅनची अपुरी व्यवस्था, प्रचंड धूळ, आजूबाजूच्या परिसरात टाकण्यात आलेले बांधकाम साहित्य अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. हे चित्र शिक्षण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाच्याच बाजूला असलेल्या केंद्रावर होते.
सरावामुळे फायदा झाला बोर्डाची परीक्षा असल्याने काहीशी चिंता असते. अभ्यास, सराव झाल्याने पेपर छान सोडवला. पेपरही सोपा होता. शाळेने घेतलेला सराव, विषय शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन याचा निश्चित फायदा झाला. - वेदिका जोशी, विद्यार्थी
केंद्र कसे दिले, याचे पितळ उघडे स्वत: शिक्षण मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाने विद्यार्थी क्षमता आणि आसनव्यवस्था याची माहिती शाळांकडून मागवली होती. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर विद्यार्थी संख्या देण्यात आली. अतिरिक्त विद्यार्थी ज्या ठिकाणी असतील त्यांना उपकेंद्र देण्यात आले. विभागात २००, तर जिल्ह्यात १२ केंद्रांवर अतिरिक्त विद्यार्थी आल्याने त्यांची तपासणी करून उपकेंद्र दिल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले. शहरातच काही केंद्रांवर छोट्या वर्गात विद्यार्थ्यांना नीट बसताही येत नव्हते. सिमेंट, धूळ, बाजूला बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आवाजही पेपर सोडवताना विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.
वेळेत पेपर सोडवता आला गेल्या दोन वर्षांत फार लिखाणाचा सराव नव्हता. त्यामुळे वेळेत पेपर होईल की नाही याची शंका वाटत होती. शाळेमध्ये झालेल्या सराव परीक्षा उपयुक्त ठरल्या. निर्धारित वेळेत पेपर सोडवण्यास या सरावाचा फायदा झाला. - रोहित जाधव, विद्यार्थी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.