आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण:जी-20 परिषदेत पालिकेची 1.12 कोटींची बॅनरबाजी

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी-२० परिषदेनिमित्त मनपाने शहरात तब्बल १ कोटी १२ लाख रुपये खर्चून बॅनरबाजी केली. व्हीआयपी रस्त्यांवरील अडगळ झाकण्यासाठी अवघ्या पाच ते सहा दिवस मोजक्याच जागांवर डिजिटल फ्लेक्स लावले होते. आता हे फ्लेक्स आणि त्याच्या फ्रेम चाेरी हाेत अाहेत. फेब्रुवारीत जी-२० ची बैठक पार पडली. त्यासाठी १९ देश आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधी शहरात आले होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी मनपाने शहरात मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण केले.

हे पाहुणे ज्या दोन-तीन प्रमुख मार्गावरून ये-जा करणार आहेत त्या मार्गांवरच ही कामे करण्यात आली होती. स्वागताचे डिजिटल फ्लेक्स लावले. मे ड्रिम्स क्रिएशन अॅडव्हर्टायझिंग या कंपनीला हे कंत्राट दिले हाेते. या एजन्सीने अंदाजपत्रकीय दरापेक्षा १५ टक्के जादा दराने निविदा दाखल केली होती. महापालिका प्रशासकांनी दराबाबत वाटाघाटी केल्यानंतर एजन्सीने हे काम १ कोटी १२ लाख रुपयांत घेतले हाेते. जळगाव रोड, ताज हॉटेलच्या आजूबाजूला आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फ्लेक्स लावले हाेते.

सुशोभीकरणासाठी मिळाले होते ५० कोटी : शहराच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटी रुपये मिळाले होते. त्यात रस्त्याच्या बाजूच्या भिंती, उड्डाणपुलावर रंगरंगोटीसाठी पाच कोटींचा निधी देण्यात आला होता. यातील तीन कोटी रुपये चित्रे काढण्यासाठी खर्ची झाले. उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी, रस्त्याचे सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी ३० कोटी, व्हर्टिकल गार्डन, कारंजे, लाइटवर पाच कोटी, पर्यटन वास्तू, वाहतूक बेटांवर विद्युत रोषणाईसाठी पाच कोटींची तरतूद हाेती. ५० कोटींतून तीन कोटी शिल्लक राहिले हाेते. अाता या खर्च व कामाच्या गुणवत्तेचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे.

तात्पुरत्या गोष्टींसाठी केली लाखो रुपयांची उधळपट्टी रस्त्यांवरील काही भाग झाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली. याशिवाय काही ठिकाणी पडदे लावले. दुभाजकांमध्ये झाडाच्या कुंड्या ठेवल्या. लाइटदेखील भाड्याने आणले होते. परिषद संपताच दुसऱ्या दिवशी ही सजावट काढण्यास सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...