आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाब्बास औरंगाबादकर:दिवसभरात 11,621 नागरिकांनी घेतली लस; शहरात लसीकरणाचा विक्रम

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जवरच्या सरासरीपेक्षा दुप्पट नाेंद, अनेक केंद्रांवर ‘नो लस’चे बोर्ड लागल्याने नाराजी

काेराेनाला पराभूत करण्याचा चंग बांधलेल्या अाैरंगाबादकरांनी साेमवारी नवा विक्रम रचला. दिवसभरात तब्बल ११ हजार ६२१ नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस टाेचून घेतली. गेल्या तीन महिन्यांत प्रथमच शहरात एवढा उच्चांकी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक केंद्रांवरील लससाठा दुपारीच संपला हाेता. एक मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येणार अाहे. त्यावेळी हाेणारी संभाव्य गर्दी व वारंवार भासणाऱ्या तुटवड्यात गैरसाेय हाेऊ नये म्हणून अाता ४५ वर्षांवरील नागरिकांचा अाेघ वाढत असल्याचे काही लाभार्थींनी सांगितले. ग्रामीण भागात १५१४ जणांनी लस घेतली.

शहरातील ११५ वॉर्डांत ११५ लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. तसेच खासगी आणि सरकारी रुग्णालय मिळून इतर २८ केंद्रेही सुरू आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत २ लाख २ हजार ८१३ नागरिकांनी लस घेतली. शुक्रवारी दुपारी लसींचा साठा संपल्यामुळे शहरात शनिवारी व रविवारी माेहिमेला ब्रेक लागला हाेता. मात्र साेमवारी १५ हजार डाेस सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी उसळली हाेती. त्यामुळे प्रत्येक केंद्राबाहेर अक्षरश: मतदानासारख्या रांगा लागल्या हाेत्या. आयएमए हॉल, विजयनगर, शिवाजीनगर, औरंगपुरा, समर्थनगर, सिडको-हडको भागातील अनेक केंद्रांवरील लस लवकर संपली. त्यामुळे काही नागरिकांना दुपारनंतर निराशेने परत जावे लागले. गादिया विहार राजनगर केंद्रावर नागरिक रांगेत उभे हाेते. मात्र दुपारपर्यंत लसींचा साठा संपला. त्यामुळे भरउन्हात उभे असलेले लाेक चिडले. केंद्राबाहेर आपसात हमरीतुमरी झाली. त्यातच काही जण आरोग्य कर्मचाऱ्यांवरही धावून गेले. परिणामी, कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राला आतून कुलूप लावून घेतले हाेते.

तरुणाईसाठी उद्यापासून अाॅनलाइन नाेंदणी; अाधी बुकिंग केली तरच लस
एक मेपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाेगटातील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी तरुणांना कोविन अॅपवर २८ एप्रिलपासून नोंदणी करता येईल. अाॅनलाइन नाेंदणी केलेल्यांसाठीच मनपाच्या ११७ लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल, असे अाराेग्य अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले. लसीकरणाची जय्यत तयारी सुरू अाहे. त्यासाठी सोमवारी देशपातळीवरील एक व्हीसी झाली. यात केवळ कोविन अॅपबद्दल माहिती देण्यात आली. मंगळवारी अाणखी एक व्हीसी हाेणार अाहे. शहरातील किती तरुणांना लस द्यायची अाहे याची आकडेवारी काढण्याचे काम मनपाकडून सुरू अाहे.

प्रथमच गाठला १० हजारांचा पल्ला
शहरात ११ जानेवारीपासून लसीकरण सुरू केले आहे. रोज सरासरी पाच ते सहा हजार लसीकरण होत होते. अातापर्यंत सर्वाधिक सात हजारांचा पल्ला गाठला हाेता. मात्र सोमवारी थेट ११ हजार आकडा पार झाला.

  • आरोग्य कर्मचारी ७१३
  • फ्रंटलाइन वर्कर्स १८४५
  • ४५ वर्षांवरील४९७४
  • ६० वर्षांवरील४०८९

अशी करावी लागेल नोंदणी
Co-win या अॅपवर अथवा cowin.gov.in या पोर्टलवर नोंदणी करता येईल. आरोग्य सेतू अॅपवरही नोंदणी होते. त्यासाठी वेबसाइट अथवा अॅप उघडल्यावर मोबाइल क्रमांक टाका. ओटीपी आल्यावर अकाउंट तयार करा. नाव, वय, लिंग, भरून एक ओळखपत्र जोडावे. त्यासाठी आधार, पॅन, मतदार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड यासह शासकीय पुरावा जो आपले वय निश्चित करेल यास प्राधान्य देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...