आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात आता भरदिवसा चोरांनी एन-१ येथील अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट फोडून १२ तोळे सोने व २८ हजार रोख रक्कम लंपास केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली. शहरात गेल्या २० दिवसांत घरफोडीच्या वाढलेल्या घटनांत ७ चोरीच्या घटना दिवसा झाल्या आहेत. १७ नोव्हेंबर रोजी एन-१ मध्ये एक, पिसादेवी-मयूर पार्कमध्ये प्रत्येकी एक, एन-४ मध्ये दोन, ३० नोव्हेंबर राेजी विटखेड्यात एक घटना घडली.
एमआयटी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी जरिन रामानी (७२) एन-१ च्या गोल्डन पॅलेस अपार्टमेंटमध्ये राहतात. त्या मंगळवारी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कर्तव्यावर गेल्या हाेत्या. परंतु, गेल्या २० वर्षांपासून कामाला असलेल्या मंगलकडे एक चावी असते. रामानी या सायंकाळी ६ वाजता घरी गेल्या असता त्यांना दरवाजा उघडला दिसला. त्यांनी अपार्टमेंटमधील सुमन चौधरी यांना कळवले. त्यानंतर त्या दोघींनी पाहणी केली असता घराच्या कुलपाचा कोेंडाच तुटलेेला होता. चोरट्यांना आतील एका ड्राॅवरमध्ये कपाटाची चावी मिळाल्याने त्यांनी ७ तोळ्याचे सोन्याचे कडे, तीन तोळ्याचा हार, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, २०० ग्रॅमचे चांदीचे ताम्हण, फुलपात्र, चमचा, पळी, २५० ग्रॅम चांदीचे नाणे व २८ हजार रोख असा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडको पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तिसगाव शिवारातदेखील चोरीची एक घटना घडली. त्यात चोरांनी सोन्याचे दागिने चोरून नेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात न आल्याने चोरीचा नेमका ऐवज कळू शकला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.