आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:199 पैकी 120 कारखान्यांचे गाळप बंद; अद्यापही निघाला नाही अनुदानाचा जीआर! अजून 80 लाख टन ऊस शेतात उभा, शेट्टी यांचा दावा

औरंगाबाद | डॉ. शेखर मगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आत्तापर्यंत १२९४.९२ लाख टन उसाचे गाळप केल्याचे साखर आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्यांच्या मते आता फक्त २५ ते २६ लाख टन ऊस शिल्लक आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी राज्यात ८० लाख टन ऊस शिल्लक असल्याचा दावा केला आहे. ३१ मेपर्यंत एकही साखर कारखाना बंद होऊ देणार नाही, असे राज्य सरकारने जाहीर करूनही आजघडीला १९९ पैकी १२० कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. विशेष म्हणजे ७ एप्रिलला जाहीर केलेल्या अनुदानाचा सरकारने अजूनही जीआर काढला नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार १२९४.९२ लाख टन गाळप झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ११३ पैकी १०५ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे, तर औरंगाबाद आणि नांदेड विभागात ५२ पैकी ११ कारखाने बंद आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात अधिक ऊस शिल्लक असल्याचे साखर आयुक्तांनी म्हटले आहे. औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डी. एल. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद विभागातील जालना, औरंगाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांत १ लाख ७० हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख २४ हजार हेक्टरवरील उसाचे गाळप झाले आहे. म्हणजेच, या तीन जिल्ह्यांतच ४५ हजार हेक्टरवरील ऊस अद्यापही शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे उत्पादन वाढल्याने अनेक ठिकाणी ऊस शेतातच उभा आहे. त्यांची अजूनही तोडणी झालेली नाही.

यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन, पश्चिम महाराष्ट्राची आघाडी
यंदा पश्चिम महाराष्ट्रात १०६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यात
-कोल्हापूर : ३० लाख टन
-पुणे : २० लाख टन
- सोलापूर : २८ लाख टन
-अहमदनगर : १९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

औरंगाबाद विभागातील २५ कारखान्यांनी १२ लाख टन साखरेचे उत्पादन केले. नांदेडच्या २७ कारखान्यांनी १४ लाख टन तर अमरावती-९ लाख टन, नागपूर विभागाने ८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.

134 लाख टन साखर तयार झाली राज्यातील आठही विभागांत आत्तापर्यंत 106 लाख टन साखर उत्पादन झाले होते मागील वर्षी त्या तुलनेत आत्तापर्यंत 28 लाख टन साखरेचे उत्पादन वाढले आहे.

अद्याप जीआर नाही, शेतकऱ्यांना प्रतीक्षा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात उसासंदर्भात व्यापक बैठक घेतली होती. बैठकीला कृषिमंत्री आणि ज्या भागात उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे, तेथील मंत्री हजर होते. त्या वेळी अजित पवार यांनी शिल्लक उसासाठी प्रतिटन ५ रुपये वाहतूक अनुदान आणि उसाच्या वजनात दहा टक्यांपेक्षा अधिक घट आली तर प्रतिटन २०० रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले होते. हे अनुदान जाहीर करून आता ३७ दिवस झाले आहेत. अद्याप जीआर काढण्यात आला नाही. या अनुदानाची शेतकरी आतुरतेने वाट पाहताहेत.

साखर आयुक्तांना ग्राउंड रिअॅलिटी माहीत नाही
साखर आयुक्तांना ग्राऊंड रिअॅलिटी माहीत नाही. महाराष्ट्रात अद्याप ३० टक्क्यांपेक्षा अधिक ऊस शिल्लक आहे. लागवडीच्या कालावधीनुसार उसाची तोडणी करून कारखान्यांनी गाळप करावे. सरकारने तसे धोरण ठरवायला हवे. शेतकऱ्यांचा १२ ते १४ महिन्यांचा ऊस शेतात तसाच ठेवला जातोय.
- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

मराठवाड्यात उसाचा प्रश्न गंभीर
बीड, परभणी, औरंगाबाद, जालना या भागात कारखान्यांचे जाळे मोठे आहे. त्यामुळे शेतकरी उसाची नोंद करत नाही. म्हणूनच शिल्लक उसाची अधिकृत आकडेवारी नाही. कारखान्यांत नोंद नसलेल्या उसाचे करायचे काय?
-डॉ. अजित नवले, शेतकरी नेते.

फक्त पाच जिल्ह्यांतील ऊस शिल्लक
आमच्या माहितीप्रमाणे २५ ते २६ लाख टन ऊस शिल्लक आहे. ३१ मेअखेरीस आम्ही तो उचलून नेऊ. शेतकऱ्यांचे नेते जास्त शिल्लक असल्याचे सांगतात, पण तो ऊस पुढच्या हंगामात जाणारा आहे. अहमदनगर, उस्मानाबाद, जालना, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतील तीस हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, प्रत्येकाचा ऊस उचलला जाईल. ज्या भागातील ऊस संपला आहे त्या भागातले कारखाने बंद होत आहेत.
-पांडुरंग शेळके, सहसंचालक, साखर आयुक्तालय

कारखान्यांची स्थिती : एकूण १९९ पैकी १२० कारखाने बंद
विभाग एकूण बंद
कोल्हापूर 36 36
पुणे 30 22
विभाग एकूण बंद
सोलापूर 47 36
अहमदनगर 27 11
विभाग एकूण बंद
औरंगाबाद 25 04
नांदेड 27 07
विभाग एकूण बंद
अमरावती 03 02
नागपूर 04 02

जालन्याच्या नालेवाडीत ९० हेक्टर ऊस जागेवरच
जालना | अंबड तालुक्यातील नालेवाडी गावात शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीवर मागील पाच वर्षांपासून अधिकच भर दिला आहे. या ठिकाणी एकूण क्षेत्राच्या ६०% क्षेत्रावर उसाची लागवड झाली. या वर्षी कारखान्याकडून ऊस नेण्यास विलंब झाला आहे. या ठिकाणी जवळपास १८० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली असून या वर्षी ५० टक्के उसाची तोडणी झाली आहे. इतर ९० हेक्टर क्षेत्रावरचा ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे तलाठी विजय जोगदंड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...