आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडाऱ्याची उधळण:काळ्या पाषाणातील 1200 किलो वजनाची नंदीची मूर्ती प्राचीन खंडोबा मंदिरात

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा येथील प्राचीन खंडोबा मंदिरात सोमवारी (१ ऑगस्ट) तब्बल १२०० किलो काळ्या पाषाणातून घडवलेल्या नंदीची स्थापना करण्यात आली. पुणे येथील स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष गौरव घोडे यांनी हा ४ फूट बाय ४ फूट आकाराचा नंदी मंदिरास भेट दिला. २०० वाघ्या-मुरळी, हजारो भाविकांनी तब्बल पाच क्विंटल भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढली. त्यानंतर दीपमाळेसमोर नंदी स्थापित करण्यात आला. सकाळी आठ वाजता खंडोबा मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गौरव घोडे, सातारा खंडोबा मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे, दिलीप दांडेकर, लक्ष्मण सोलट, गणेश खोरे आदींची उपस्थिती होती.

वाद्यवादन आणि खंडोबाची गाणी गात सातारा गावातून निघालेल्या मिरवणुकीने वातावरण दुमदुमून गेले होते. केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील अनेक भाविकाही या उत्साहात सहभागी झाले होते. या वेळी “यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करण्यात आला. भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसर हळदीच्या रंगाने न्हाऊन निघाला होता. खंडोबा मंदिर विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने येथील विकासासाठी ५६ कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला होता. यातून मंदिरात दीपमाळ सुशोभिकरण, सभामंडप,भक्तनिवास, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळ, पथदिवे, हायमास्टची व्यवस्था होणार आहे.

ग्रामदैवत खंडोबा महादेवाचे रूप, म्हणून त्यासमोर नंदीला असते मानाचे स्थान श्री खंडोबा देवतेला महादेवाचे रूप मानले जाते. त्यामुळे या मंदिरात भाविकांकडून नंदीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुण्याहून टेम्पोने नंदी मंदिरात आणला. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने मंदिराच्या प्रांगणात आणला गेला. प्राणप्रतिष्ठेच्या जागी ठेवण्यासाठी एक ते दीड तास प्रयत्न करावे लागले. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. देवगाव रंगारी, चिंचोली, पैठण, दहेगाव, गंगापूर, चिकलठाणा, जालना, राजूर, औरंगाबाद येथून २०० हून अधिक वाघ्या-मुरळी आले होते.

बातम्या आणखी आहेत...