आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 तास झडती:लाचखोर जऊळकरने रोखले 20 टक्क्यांसाठी 1.25 कोटी

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकाच्या कर्करोगग्रस्त पत्नीचे मेडिकल बिल ट्रेझरी कार्यालयाकडे पाठवण्यासाठी २० टक्के कमिशन मागणारा वेतन अधीक्षक दिलीपकुमार परशुराम जऊळकर (५०, रा. एन-४) याला बुधवारी ५० हजारांची लाच घेताना मुद्देमालासह पकडण्यात आले. त्यानंतर शिक्षण विभागातून त्याच्या त्रासाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वीस टक्के कमिशनसाठी एका शिक्षण संस्थाचालकाचे सव्वा कोटी रुपयांचे पगाराचे बिल त्याने थकवल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी शिक्षण विभागातील अनेकांनी त्याच्यावर झालेल्या कारवाई अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, जऊळकरला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

लाच प्रकरणातील तक्रारदाराचे वडील व पत्नी यांच्यावरील उपचाराच्या ६ लाख ६३ हजार ६५२ रुपयांच्या मेडिकल बिलासाठी जऊळकरने २० टक्के कमिशन मागितले होते. कमिशन दिल्याशिवाय हे बिल ट्रेझरीत जाऊ देणार नाही, तसेच त्रुटी काढून ते मंजूरही होऊ देणार नाही, अशी धमकी जऊळकरने दिली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. तक्रारदाराकडून ५० हजार रुपये घेताना एसीबीचे निरीक्षक संदीप राजपूत यांनी त्याला मुद्देमालासह अटक केली.

शिक्षण संस्थाचालकाने वाचला त्रासाचा पाढा
जऊळकरवर कारवाई होताच एका शिक्षण संस्थाचालकाने गुरुवारी सकाळीच एसीबी कार्यालयात धाव घेत आटोळे यांच्याकडे त्याच्या त्रासाचा पाढाच वाचला. कोरोना काळापासून त्यांच्या संस्थेचे पगाराचे सव्वा कोटी रुपयांचे बिल २० टक्के कमिशनसाठी जऊळकरने थकवल्याचे त्यांनी सांगितले. जऊळकर आधी स्पर्धा परीक्षांचे क्लासेस चालवत होता. वैजापूरला रुजू झाल्यानंतर अतिशय साधे राहणीमान असलेल्या जऊळकरकडे अल्पावधीत कोट्यवधींची माया जमा झाली. त्याची पत्नीही शिक्षिका आहे.

१.२ कोटींचा प्लाॅट, १५ ताेळे सोने
जऊळकरच्या एन-४ येथील घराच्या झाडाझडतीमध्ये १५ तोळे सोने, १.२ कोटी रुपयांची प्लॉटची कागदपत्रे, ८३० ग्रॅम चांदी व ४५ हजार रोख रक्कम आढळून आली. पत्नीच्या नावे आयसीआयसीआय बँकेत लॉकर आहे. ते उघडणे बाकी आहे. त्याच्या लॉकरची तपासणी केली जाईल. जऊळकरविरोधात आणखी कोणाचीही तक्रार असल्यास त्यांनी विभागाकडे तक्रार करावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...