आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यंदापासून नवीन शैक्षणिक धोरण अंशत: लागू करण्यास सुरुवात केली आहे. पण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचे (एबीसी) अकाउंट निर्माण करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात आतापर्यंत १.२५ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एबीसी अकाउंट मात्र १० हजार विद्यार्थ्यांचेच तयार झाले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत सर्वांचे अकाउंट तयार केले तरच प्रथम सत्र केलेल्या विद्यार्थ्यांचे क्रेडिट त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जाऊ शकतील. त्यासाठी दहा कॉलेजांचे एक क्लस्टर करून उपाययोजना केल्या जात आहेत.
विद्यापीठ कायद्यानुसार विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, सामाजिक शास्त्रे आणि आंतरविद्याशाखीय अशा चार विद्याशाखा आहेत. या चारही विद्याशाखांचे १३७ अभ्यासक्रम विद्यापीठात आणि संलग्नित महाविद्यालयांत शिकवले जातात. सर्व अभ्यासक्रमांच्या जवळपास ६५० पेपर्सच्या परीक्षा घेतल्या जातात. हा सर्व डेटा डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करणे गरजेचे आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीएस, बीसीए, बीबीएसह विविध अभ्यासक्रमांची तीन वर्षांत एकूण सहा सत्रे आहेत. प्रत्येक सत्रात किमान ५ पेपर घेतले जाणार आहेत. एका पेपरचे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सत्रात ५० गुण दिले जातील.
त्यापैकी ४० लेखी तर १० गुण प्रात्यक्षिकचे असतील. विद्यार्थ्यांचे गुण श्रेयांक अर्थात चॉइस बेस्ड क्रेडिट अँड ग्रेडिंग सिस्टिमने (सीबीसीएस) त्यांच्या एबीसी अकाउंटवर ट्रान्सफर केले जाणार आहेत. पण त्यासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एबीसी अकाउंटच अद्याप तयार करण्यात आलेले नाही. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे एबीसी अकाउंट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक दहा कॉलेजांचे क्लस्टर करून विद्यार्थ्यांचे एबीसी अकाउंट तयार करावे लागणार आहे.
विद्यार्थी स्वत: तयार करू शकतात एबीसी अकाउंट केंद्राच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी अर्थात ‘एनएडी’ची निर्मिती केली आहे. एनएडीवरच अकाउंट क्रिएट केले जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यंदापासून डिजी लॉकर, एनएडी, एबीसी असे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत.
विद्यार्थ्यांनी गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जाऊन डिजी लॉकर लिंकमध्ये जावे. डिजी लॉकरला आल्यावर आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाकून लॉग-इन करावे. पासवर्ड टाकून एबीसी आयडी मिळवावा. त्यानंतर एज्युकेशन कॅटेगरीत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सर्व्हिस ओपन होईल. एबीसी आयडी क्रिएट झाल्यानंतर आपले विद्यापीठ निवडून क्यूआर कोड असलेेले एबीसी कार्ड तयार होईल. www.abc.gov.in या लिंकवर जाऊनही अकाउंट निर्माण होऊ शकते.
अकाउंटमध्ये विद्यार्थ्यांचे क्रेडिट कायम सेव्ह असतील प्रत्येक वर्षाचे ६० क्रेडिट विद्यार्थ्यांच्या एबीसी अकाउंटवर ट्रान्सफर केले जातील. ६० क्रेडिटनंतर प्रमाणपत्र, त्यात आणखी ६० क्रेडिट जमा झाले तर १२० क्रेडिटचे पदविका प्रमाणपत्र, त्यात आणखी ६० क्रेडिट जमा झाले तर १८० क्रेडिटसाठी पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. सध्या इथपर्यंत मर्यादित आहे. पण भविष्यात चौथ्या वर्षाचे आणखी ६० क्रेडिट जमा झाले तर पीजी + डिप्लोमा असे प्रमाणपत्र मिळेल. हे विद्यार्थी हिताचे अकाउंट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.