आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:जिल्ह्यात वर्षभरात बायोडिझेलचे 13 गुन्हे; दीड कोटीपेक्षा अधिक माल जप्त

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने बायोडिझेल (बी १००) विक्रीला परवानगी दिल्याची संधी साधून औरंगाबाद जिल्ह्यात बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधनाची विक्री जोरात सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून अवैध पद्धतीने बायोडिझेलचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात वर्षभरात १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, जवळपास दीड कोटीचे बायोडिझेल व त्याची साधनसामग्री जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी दिली.
विशेष बाब म्हणजे जे बायोडिझेल प्रशासनाकडून जप्त करण्यात येत आहे, ते मुळात बायोडिझेल नसल्याचे ऑल इंडिया बायोडिझेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण काळे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. हे बायोडिझेल विनापरवाना वाहनात भरले जाते. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज, क्रांती चौक, सिडको आणि एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातच जवळपास ८५ लाख ९० हजारांपेक्षा अधिक रुपयांचे बायोडिझेल आणि साधनसामग्री पोलिसांनी पुरवठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जप्त केली आहे. आजच्या बाजारभावानुसार लिटरमागे डिझेलचा रेट साधारण ९५ रुपये एवढा आहे, तर बायोडिझेल ६० ते ७० रुपये प्रतिलिटर दराने मिळते.

बायोडिझेल म्हणजे काय?
जैविक कचऱ्यापासून बायोडिझेलची निर्मिती होते. डिझेलपेक्षा बायोडिझेल २० ते २५ रुपयांनी स्वस्त आहे. डिझेलमध्ये ठराविक लिटरच्या प्रमाणात १० ते २० टक्के बायोडिझेल मिसळले जाते. मात्र, बायोडिझेल विक्रेते डिझेल, बायोडिझेल व फ्युएल ऑइल या तिन्हींची भेसळ करून ते विकतात. बायोडिझेल पंपासाठीही पेट्रोल पंपाप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य विविध विभागांच्या १२ परवानग्या घेणे आवश्यक असते. तसेच डिझेलवर २१ टक्के व्हॅट, अबकारी कर, दुष्काळी कर यासह विविध प्रकारच्या करांची रक्कम ४७ टक्के एवढी असते. बायोडिझेलवर फक्त १८ टक्के जीएसटी असल्याने ते स्वस्तात पडते.

शहरात येते कुठूनॽ
अवैध विकले जाणारे बायोडिझेल इतर देशांमधून जहाजाद्वारे देशात येते. गुजरातसह ज्या राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्या ठिकाणाहून ते देशात खाद्यतेलाच्या नावाने कंटेनरद्वारे येते. यानंतर याचा व्यापार करणाऱ्या लोकांनी पेट्रोल पंपासारखा त्याचा साठा करून विक्री करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात सध्या तरी एकाही ठिकाणी अशा प्रकारे बायोडिझेलची विक्री होत नाही.

गुन्हे का दाखल होतात?
कर बुडवून आणलेले बायोडिझेल छुप्या पद्धतीने वाहनात भरल्यामुळे करचोरी होते, महसूल बुडतो म्हणून त्यावर जिल्हा पुरवठा विभाग व पोलिस प्रशासन गुन्हे दाखल करतात. या कारवाईवेळी जे लोक उपस्थित असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. शहरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये एका मोठ्या गुटखा व्यापाऱ्याचा समावेश होता. त्याच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पकडलेले बायोडिझेल केले जाते नष्ट : पोलिस जेव्हा अवैध बायोडिझेलचा साठा जप्त करतात तेव्हा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचीही तेथे उपस्थिती असते. त्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला जातो. बायोडिझेलचा साठा जप्त केल्यानंतर नापीक जमिनीत खड्डा करून त्यात ओतून त्याची विल्हेवाट लावली जाते. याचा व्हिडिओ बनवून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येतो, अशी माहिती पुरवठा अधिकारी कविता गिरणे यांनी दिली. आजवर ३५ जणांपेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...