आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अहवाल:देशातील 13% लोक कर्ज काढून भागवतात रुग्णालयाचा खर्च

अजय कुलकर्णी | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीय नमुना पाहणी अहवाल : 80% भारतीयांकडे आरोग्य विमाच नाही

देशाच्या ग्रामीण भागातील १३ टक्के कुटुंबे कर्ज काढून रुग्णालयाचा खर्च भागवतात, तर शहरी भागातील ९ टक्के लोकांना वैद्यकीय खर्चासाठी कर्ज काढावे लागते, असा धक्कादायक निष्कर्ष आरोग्यविषयक राष्ट्रीय नमुना पाहणी सर्वेक्षणातून समोर आला आहे. देशातील ग्रामीण कुटुंबांचे वर्षाकाठी सरासरी १६,६७६ रुपये तर शहरी कुटुंबाचे २६,४७५ रुपये रुग्णालयापोटी खर्च होतात. वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विम्याचे संरक्षण ८० टक्के भारतीयांकडे नसल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अहवालात म्हटले आहे.

राष्ट्रीय नमुना पाहणीअंतर्गत आरोग्यविषयक हे सर्वेक्षण जुलै २०१७ ते जून २०१८ या काळात घेण्यात आले. या सर्वेक्षणात ५ लाख ५५ हजार व्यक्तींचे मत जाणून घेण्यात आले. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्यासंबंधी सेवांवरील खर्च, खासगी तसेच सरकारी आरोग्य सुविधा, देशातील विविध आजार याबाबत या सर्वेक्षणातून माहिती घेण्यात आली.

अहवालानुसार, ग्रामीण भागातील ८५.९ टक्के कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण नाही. शहरात हेच प्रमाण ८०.९ टक्के आहे. विशेष म्हणजे महाग असूनही ५५ टक्के भारतीय खासगी रुग्णालयातच उपचारास पसंती देतात, तर ४२ टक्के लोक सरकारी रुग्णालयात येतात. ग्रामीण भागातील १३ टक्के तर शहरी भागातील फक्त ९ टक्के लोकांना सरकारी आरोग्य योजनांचा लाभ मिळतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा सर्वेक्षणात समावेश नाही.

आरोग्यासाठी बचतीवर घाला

आरोग्य विमाचे संरक्षण नसणे आणि महागडे उपचार यामुळे भारतीयांना कुटुंबाचा वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी बचतीवर घाला घालावा लागतो किंवा कर्ज काढावे लागते, असे अहवालात म्हटले आहे. वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी ग्रामीण भागात ८० टक्के कुटुंबांना बचतीचे पैसे मोडावे लागतात, तर १३ टक्के लोकांना विविध मार्गांनी कर्ज घ्यावे लागते. शहरात ८४ टक्के लोक बचतीवर अवलंबून असतात, तर ९ टक्क्यांना कर्ज काढावे लागते.

खासगी रुग्णालयात उपचार सहापटीने महाग

या अहवालानुसार, रुग्णालयातील उपचारांबाबत सरकारी सेवा तुलनेत स्वस्त असून खासगी रुग्णालयात उपचार घेणे सहापटीने महाग आहे. ग्रामीण भागात सरकारी दवाखान्यातील उपचारांसाठी सरासरी ४२९० रुपये तर शहरी भागात ४८३७ रुपये खर्च आला. खासगी रुग्णालयातील उपचारांसाठी ग्रामीण भागात २७,३४७ रुपये तर शहरी भागात ३८,८२२ रुपये खर्च आला.