आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर थकीत:शहरात 13 हजार मालमत्ताधारकांकडे 513.61 कोटी रुपयांचा कर थकीत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. एक लाखापासून ते दहा लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शहरातील सुमारे १३ हजार ४११ मालमत्ताधारकांकडे ५१३.६१ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी या मालमत्ताधारकांना झोन कार्यालयाकडून जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. थकीत कराची रक्कम जमा न केल्यास जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला. सुरुवातीला झोनमधील मालमत्ता कराच्या मागणी पत्राचे (डिमांड नोटीस) घरोघरी वाटप झाल्याच्या आढावा घेतला. सुमारे ८० टक्के डिमांड नोटिसा घरोघरी पोहोचल्या असून उर्वरित लवकरच पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत मालमत्ता कराचे ५४.०७ कोटी आणि पाणीपट्टीचे १०.६९ कोटी याप्रमाणे ६४ कोटी ७६ लाख रुपयांची करवसुली झाली आहे. प्रशासक चौधरी यांच्या निदर्शनास हे येताच त्यांनी वसुलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

कराच्या वसुलीसाठी कर्मचारी घरोघरी जात नसल्याबद्दलही त्यांनी विचारणा केली. अनेक भागांत डिमांड का पोहोचल्या नाहीत याची माहिती देण्याची सूचना वाॅर्ड अधिकाऱ्यांना केली. प्रशासनाने १ ते ५ लाख, ५ ते १० लाख आणि १० लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वॉर्ड अधिकाऱ्यांनी याद्या तयार केल्या आहेत. त्याचे वर्गीकरण करून थकबाकी वसूल करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार वॉर्ड कार्यालयाकडून थकबाकीदार असलेल्या १३ हजार ४११ मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत.

वसुलीत अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
आता मालमत्ता कराच्या वसुलीसंदर्भात दर आठवड्याला झोननिहाय आढावा घेणार असल्याची माहिती मनपाचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. वसुलीच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली जास्तीत जास्त करण्यात यावी यासाठी सहायक वॉर्ड अधिकारी व वसुली अधिकारी यांच्याकडून दररोज अहवाल मागवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...