आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पडेगावात 13 वर्षीय मुलीच्या गळ्याला चाकू लावून लूटमार; तीन घरातून दहा तोळे सोने, 60  हजार रुपयांची रोख लांबवली

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन शस्त्रधारी चोरांनी पडेगावातील ग्रीन व्हॅली पार्कमध्ये तीन घरे फोडत १० तोळे सोने, चार मोबाइल, ६० हजार रोख रक्कम, ५५० ग्रॅम चांदीची लूटमार केली. शेवटच्या घरात १३ वर्षांची मुलगी झोपेतून उठल्याने तिच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत चोरी केली. एका घरात मात्र त्यांना काही मिळाले नाही.

मौलाना आझाद हायस्कूलमध्ये लिपिक असलेले रवींद्र दहाट (५२) हे पत्नी, तीन मुलांसह पडेगावच्या साई मंदिराजवळ असलेल्या ग्रीन व्हॅलीत राहतात. बुधवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कुटुंब घरात झोपेत असताना चोरांनी घरात प्रवेश केला.

सकाळी ६.३० वाजता जाग आल्यानंतर दहाट यांना खालच्या मजल्यावरील सामान अस्ताव्यस्त दिसले. हॉलचा दरवाजा फोडलेला हाेता. त्यांनी तत्काळ घरात पाहणी केली असता ४० ग्रॅमचे मंगळसूत्र, २५ ग्रॅमची पोत, ९ ग्रॅमचे नेकलेस, ९ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील पदक, चार मोबाइल, रोख २० हजार चोरीला गेल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद इंगोले, सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले, गुन्हे शाखेचे अधिकारी, श्वान पथक, ठसेतज्ज्ञांसह धाव घेत पाहणी केली.

एक घर रिकामे : दहाट यांचे घर फोडताना चोरांनी त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला. त्यानंतर त्यांनी शेजारचे घर फोडले. मात्र, तेथे कोणी नसल्याने त्यांच्या हाती काहीच ऐवज लागला नाही. त्यानंतर अडीच वाजता शेजारी राहणारे मोहंमद मनसुख शेख (३७) यांच्या घरात चोरांनी प्रवेश केला.
शेख वरच्या मजल्यावर झोपलेले हाेते. परंतु चोरांचा आवाज ऐकताच त्यांच्या तेरा वर्षांच्या मुलीला जाग आली. चोरांनी लगेच तिच्या गळ्याला चाकू लावत आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर इतर दोघांनी चांदीचे १४ पैंजण, ४० ग्रॅम चांदीचे ब्रासलेट, १० ग्रॅम सोन्याची पोत, ५ ग्रॅम कानातले झुंबर, १ ग्रॅम नथ, २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४० हजार रोख रक्कम चोरून नेली. घाबरलेली मुलगी नंतर धावत वर गेली व आईवडिलांना घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

सलग तीन दिवस चाेऱ्या
तीन दिवसांपासून शहरात चोरीचे सत्र सुरू आहे. माळीवाडा परिसरात रात्रीतून तब्बल १२ शटर फोडण्यात आले. त्यानंतर वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ६ तोळे सोने लंपास झाले. आता पडेगावात शस्त्रधारी चोरांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

बातम्या आणखी आहेत...