आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनपावलाने गोदामाय आली:हवामान खात्याचा अंदाज धुडकावून मराठवाड्यात 138% विक्रमी पाऊस; नाशिकच्या गंगापूर-दारणा धरणातून विसर्ग सुरू; जायकवाडीत आज पोहोचणार

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • गोदाकाठ परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

मान्सूनबाबत हवामान खात्याचा अंदाज धुडकावत यंदा मराठवाड्यात धो-धो पाऊस पडला. रविवारपर्यंत मराठवाड्यात एकूण १३८.८ टक्के विक्रमी पावसाची नोंद झाली. अधिकच्या पावसामुळे मराठवाड्यात यंदा उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मुबलक असेल. दरम्यान, नाशिकमध्येही जोरदार पावसामुळे धरणे तुडुंब भरली असून रविवारी गंगापूर धरणातून १,५२० क्युसेक, तर दारणा धरणातून १२,७८८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरीचा हा जलौघ सोमवारपर्यंत जायकवाडी धरणात पोहोचेल.

मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांत ६६.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १६४.६ मिमी म्हणजे २४७.९ टक्के पाऊस पडला. यामुळे मान्सूनच्या सरासरी पावसात १४ टक्क्यांनी वाढ होऊन रविवारपर्यंत मराठवाड्यात एकूण १३८.८ टक्के विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अतिपाऊस खरिपातील सर्वच पिकांना मारक ठरू लागला आहे, तर रब्बी-जलसंचयासाठी उपयुक्त ठरत आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीइतका किंवा त्यापेक्षा ५ टक्के कमी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात हवामान पोषक राहिल्याने १२ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७९.९ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ८०४.७ मिमी म्हणजे १३८.८ टक्के पाऊस पडण्याची नोंद महसूल, कृषी, हवामान विभागाने घेतली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटणार आहे.

नाथसागराचा पाणीसाठा ५६ टक्के
पैठण | चार दिवसांतील पा‌वसाने मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पाणीसाठा ५६.५५ टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती सहायक अभियंता विजय काकडे यांनी दिली. रविवारी आवक कमी होती, परंतु गंगापूर आणि दारणा धरणातून रविवारपासून विसर्ग सुरू झाल्याने ते पाणी पोहोचण्यास १२ ते १४ तास लागणार आहेत. त्यानंतर नाथसागराच्या पातळीत वाढ होईल. गतवर्षी या दिवसात जायकवाडीच्या २७ गेटमधून गोदावरीत पाणी सोडले जात होते.

नाशकात मुसळधार; गंगापूर धरणातून १५२०, तर दारणातून १२,७८८ क्युसेक विसर्ग
नाशिक | दाेन दिवसांपासून नाशिक शहरासह धरणांच्या पाणलाेट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू अाहे. या पावसामुळे गंगापूर धरण ९६.८२ टक्के, तर दारणा धरणाची पातळी ९७.१० टक्क्यांवर पाेहाेचली अाहे. यामुळे रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून १,५२० क्युसेक वेगाने, तर दारणा धरणातून १२,७८८ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत हाेता. पाण्याची पातळी वाढल्यामुळे रामकुंड, गाेदाकाठ परिसरातील रहिवाशांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

येत्या ४८ तासांत हलका ते मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कोकण, मुंबई, नाशिक, पुणे, नगर, विदर्भात जेथे पोषक वातावरण तयार होईल तेथे येत्या ४८ तासांमध्ये मुसळधार ते अति पाऊस होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...