आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:लॉकडाऊन निर्बंधांमुळे 1,400 विवाह सोहळे तूर्तास झाले रद्द

औरंगाबाद8 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • शुभमंगल लांबणीवर, मेमधील 46 मुहूर्तही हुकणार, 12 व्यवसायांवर गदा

लॉकडाऊनमुळे एप्रिल-मे महिन्यातील विवाह, साखरपुडा आणि उपनयनाच्या २७ मुहूर्तांवर विघ्न अाले असून १४०० विवाह सोहळे अडचणीत आले आहेत. शासनाने लागू केलेल्या २५ सदस्यांच्या उपस्थितीमधील विवाहाला अनुकूलता नाही. यामुळे मंगल कार्यालयांसाेबतच पुरोहित, वाजंत्री, बँड, केटरिंग, फुलवाले अशा १० ते १२ व्यवसायांवर गदा आली आहे. मेमध्ये मंगल कार्याच्या ४६ तारखा असून त्याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. राज्यामध्ये २२ ते ३१ एप्रिलदरम्यान लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या नवीन नियमावलीत विवाह सोहळ्यांसाठी दोन तास वेळ आणि २५ जणांच्या उपस्थितीलाच परवानगी देण्यात आली आहे. यामुळे बहुतांश यजमान विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहेत. वर्षभरामध्ये आधीच डबघाईला आलेला विवाह क्षेत्राशी संबंधित बाजार या निर्णयामुळे हवालदिल झाला आहे.

महिनाभरामध्ये २७ मुहूर्त
एप्रिल महिन्यात साखरपुड्याचे १, ३, ५, ६, ७, ८, १६, १७, २२, २४, २५, २६, २८, ३० असे १३; विवाहाचे २२, २४, २५, २६, २८, २९, ३० असे ७, तर उपनयन संस्काराचे २२, २३, २९ असे ३, तर जावळाचे ७, १९, २५, २६ हे ४ मुहूर्त असे एकूण २७ मुहूर्त होते, अशी माहिती ब्राह्मण पुरोहित संघटनेचे जिल्हा संघटक सुभाष मुळे गुरुजी यांनी दिली.

काही वाद, काही सामोपचार
औरंगाबाद केटरर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि शांती केटरर्सचे संचालक रवींद्र मोदी म्हणाले, कार्यालये कित्येक महिने आधी बुक होतात. नवीन नियमात विवाह मान्य नसणाऱ्यांना पैसे परत करण्याऐवजी आम्ही पुढील तारखा देत आहोत. मात्र, काहींनी गावाकडे शेतात, घरच्या घरी तर काहींनी फार्म हाऊसवर लग्न उरकून घेतले आहेत. ते पैशासाठी तगादा लावत आहेत. आमची पैसे परत करण्याची स्थिती नाही. यातून थोडे वाद होत आहेत. सामोपचारातून मार्ग काढतोय. गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले. यंदा त्याचीच पुनरावृत्ती होतेय.

दोन तासांत अशक्य
सुभाष मुळे म्हणाले, जिल्हाबंदीमुळे बाहेरगावच्या वऱ्हाडींना येण्यात अडचण आहे. सत्यनारायण पूजाच दीड तास चालते. दोन तास नवरीला नटायला लागतात. सिमंती, वांङ््निश्चय, कन्यादान, सप्तपदी, कानपिळणी, सूनमुख, झाल, फळभरणी आणि लक्ष्मीपूजन या विधींना दोन तास पुरत नाहीत. हा विवाह संस्कार असून विवाह सोहळा नाही. यजमानांना घाईत केलेले विवाह मान्य नाहीत. यामुळे ९५ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी विवाह पुढे ढकलले आहेत. अत्यंत तातडीचे न टाळता येणारे ५ टक्के विवाहच होत आहेत.

मेबाबतीतही साशंकता
मेमध्ये साखरपुड्याचे (१२) दिनांक १, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २८, ३०, ३१; विवाहाचे (१५) मुहूर्त दि. १, २, ३, ४, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१, उपनयनचे (०७) दि. २, १३, १६, १७, २८, ३०, ३१, तर वास्तुशांतीचे (०६) दि. १३, १५, २२, २४, २६, २८, ३१ असे मुहूर्त आहेत. रुग्णवाढीचा दर बघता विवाहांवरील निर्बंध उठवणार नसल्याचे दिसते. यामुळे यंदाचा हंगाम वाया जाण्याची भीती सुभाष मुळे यांनी व्यक्त केली.

अट : २५ सदस्यांच्या मर्यादेमुळे अडचण
जटवाडा भागातील मांगल्य ग्रुपचे रूपेश पाटील म्हणाले, शहर व शहराभोवती सर्व मिळून २०० मंगल कार्यालये, लॉन्स, ओपन स्पेस, कम्युनिटी सेंटर आहेत. दाट तिथीला हे सर्वच बुक असतात. एप्रिलमध्ये प्रत्येकी ७ तिथींना २०० विवाहाप्रमाणे १४०० विवाह झाले असते. त्यांच्यासहित साखरपुडे आणि उपनयन संस्कारही पुढे ढकलण्याकडे कल आहे.

बारा व्यवसाय अडचणीत
एका विवाहासाठी मंगल कार्यालय, पुरोहित, केटरिंग, बँडबाजा, वाजंत्री, घोडा, लायटिंग, अँँकर, साउंड सिस्टिम, फुलवाला, फाेटोग्राफर, व्हिडिओग्राफर आदींच्या सेवा लागतात. मात्र, विवाह सोहळे पुढे ढकलल्यामुुळे सर्वांची उपजीविका अडचणीत आली आहे.

कामगारांचे हाल
कार्यालये, केटरिंग व्यावसायिकांकडे राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश आणि दिल्लीचे नागरिक आचारी, वेटर, हेल्पर म्हणून काम करतात. एका विवाहाला ५० ते ६० जणांना काम मिळते. अनलॉकनंतर परप्रांतीय कामगार परतले होते. मात्र, लॉॅकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पैकी ९० टक्के गावी परतल्याचे राजस्थानचे ठेकेदार कांती कौशल म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...