आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जिल्ह्यात 1496 कोटींचे पिक कर्ज वाटप होणार!

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खरीप आणि रब्बी हंगामासाठी राज्य शासनाने कर्ज उपलब्ध करुन दिले

कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना बळीराजा मात्र काळ्या आईची ओटी भरण्यासाठी तयारीला लागला असल्याचे चित्र ग्रामीण भागांमध्ये पहायला मिळते. राज्य शासनानेही त्यांच्या या प्रयत्नाला हातभार लावण्याचे धोरण स्वीकारले असून कर्ज रुपाने मदत केली जात आहे. यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी 1496 कोटी रुपयांचे पिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणी करण्यासाठी शेतीची मशागत सुरु केली आहे. शेतात नांगरणी, मोगडणी आणि पाळी टाकून शेत खरीप पेरणी योग्य करून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून  जिल्ह्यासह मराठवाडा विभागावर गत वर्षाचा अपवाद वगळता गेल्या काही वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते,  यंदा मात्र समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, या आनंदी बातमीने बळीराजा अगोदरच सुखावला असून या आनंदात शेतकरी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी जोरदारपणे कामाला लागला आहे.

1496 कोटींचे पीक कर्ज मिळणार  

अवर्षणग्रस्त परिस्थितीमुळे कर्जाचा डोंगर वहात असलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवून दिलासा दिला आहे. शेतकरी मुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या योजनेत विशेष लक्ष घातले, त्याचा परिणाम शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. कर्ज माफी झाली,  पुढे पिक कर्ज मिळेल किंवा नाही याबद्दल विरोधकांकडून साशंकता व्यक्त केली जात असताना राज्य शासनाने शेतकऱ्यांना मागणीनुसार पिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा 1496 कोटी रुपयांचे पिक कर्ज विविध बॅकामार्फत उपलब्ध करून दिले आहे, यामध्ये सन 2020-21 या वर्षातील खरीप हंगामासाठी 1196 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना दिले जाणार आहे, शिवाय रब्बीसाठी 299 कोटी असे एकूण 1496 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 514 कोटी,  व्यापारी बॅंक 839 कोटी आणि ग्रामिण बॅंके मार्फत 142 कोटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.

कर्ज वाटप प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागणीनुसार सहज, सुलभ पिक कर्ज उपलब्ध व्हावे असेच धोरण शासनाने राबविण्याचे ठरविले आहे,  त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्याचे उद्योग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच घेतलेल्या खरीप पेरणी पूर्व आढावा बैठकीत यासंबंधी संबंधितांना सुचना केल्या होत्या, त्यानुसार आतापर्यंत विविध बॅंकांनी 7 हजार 348 सभासद शेतकऱ्यांना 295 कोटी 3 लाखांचे कर्ज वाटप केले आहे. वाटप केलेल्या कर्जाची टक्केवारी 1.97 असून सर्वाधिक 5.05 टक्के जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...