आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यातील 15 नगर पालिकांचा होणार गौरव,  हिंगोली नगरपालिका मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान सन १९-२० अंतर्गत राज्यातील १५ नगरपालिकांच्या गौरव केला जाणार असून यामध्ये हिंगोली नगरपालिकेचा समावेश आहे. हिंगोली पालिकेने मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

केंद्र शासनाने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सन १९-२० राबवली आहे या अभियानांतर्गत पालिका क्षेत्रांतर्गत स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृह बांधकाम, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम व त्याचा वापर यासह सह इतर स्वछता विषयक बाबी राबवण्यात आल्या आहेत.

या अभियानामध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता विषयक विविध उपक्रमा सोबतच पालिकेची करवसुली तसेच इतर निकषांची केंद्राच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर झाला होता. केंद्र शासनाने आता राज्यातील १५ उत्कृष्ट नगरपालिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हिंगोली नगरपालिके सह कराड, सासवड, लोणावळा, रत्नागिरी, शिर्डी, पन्हाळा, बल्लारपूर, शेगाव, विटा, इंदापूर, वरोरा या नगरपालिका यांचा समावेश आहे.

दरम्यान कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नगरपालिकांचा ऑनलाईन गौरव होणार आहे.

दरम्यान हिंगोली नगरपालिका मराठवाड्यातील एकमेव नगरपालिका असून पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष बाबाराव बांगर उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह नगरसेवकांच्या सहकार्याने शहरात स्वच्छतेबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. विशेष म्हणजे मुख्याधिकारी पाटील यांनी लोकप्रतिनिधी, नगरपालिकेचे पदाधिकारी नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे फलित पुरस्काराच्या रूपाने हिंगोली नगरपालिकेला मिळाले आहे. हिंगोली पालिकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांचे नागरिक व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे हिंगोली पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...