आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसाठी सहयोग:जी-20 च्या बैठकीसाठी प्रशासनासोबत 15 संघटना करणार काम ; तीन चौकांचे सुशोभीकरण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताकडे या वर्षी जी-२० परिषदेचे यजमानपद आहे. राज्यातील चार शहरांत परिषदेच्या बैठका होणार आहेत. यामध्ये औरंगाबादची निवड झाली आहे. औरंगाबादमध्ये फेब्रुवारीत बैठक होणार असून त्यासाठी २० सभासद देश, ९ आमंत्रित देश आणि इतर १४ जागतिक संघटनांचे प्रतिनिधी येतील. या वेळी औरंगाबादचे प्रदर्शन सर्वोत्तम व्हावे यासाठी विविध १५ संघटना मिळून प्रशासनासोबत काम करत आहोत. सिद्धार्थ उद्यान चौक, हर्सूल टी पॉइंट चौक आणि खाम नदी चौकाचे सुभोभीकरण, होर्डिंग्ज, दिशादर्शक फलक यासाठी असोसिएशन २५ लाख रुपये खर्च करणार आहे, असे टीम ऑफ असोसिएशनचे तसेच औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी सांगितले. या वेळी सीएमआयए अध्यक्ष नितीन गुप्ता, इंडस्ट्रियल सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष सूरज ढुमणे, सीआयआयचे विभागीय अध्यक्ष प्रसाद कोकीळ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय कांकरिया आणि कल्याण वाघमारे, मसिआचे दुष्यंत आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुप्ता म्हणाले, ‘टीम ऑफ असोसिएशन हा एक अनौपचारिक मंच आहे. त्यात शहरातील १५ संघटना एकत्र येऊन काम करत आहेत. जबाबदार नागरिक म्हणून ही संघटना शहरातील जी-२० बैठकीचे उत्कृष्ट आयोजन व्हावे, शहराची उत्तम प्रतिमा निर्माण व्हावी, या उद्देशाने शहर प्रशासनासोबत काम करत आहे.’ कोकीळ म्हणाले, ‘शहरात होणारी ही बैठक सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आपल्या शहराचे मार्केटिंग उत्तमरीत्या झाले तर पर्यटकांची संख्या वाढेल, गुंतवणूकही येऊ शकते. याचा फायदा शहरातील सर्वच नागरिकांना होईल. त्यासाठी आमच्यासाेबतच लोकांनीही उत्स्फूर्तपणे पुढे यावे.’

आयसीआयसीआय बँक देणार ५ स्मार्ट स्वच्छतागृहे ‘दिव्य मराठी’ तर्फे आयोजित जी- २० टॉक शोमध्ये स्मार्ट सिटीचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी स्मार्ट प्रसाधनगृहे उभारण्याचे आवाहन उद्योगविश्वाला केले होते. आता आयसीआयसीआय बँकेतर्फे ५ स्मार्ट स्वच्छतागृहे दिली जाणार आहेत. पाच शाळांत व प्राथमिक आरोग्य केंद्रांत सौरऊर्जा पॅनल बसवून देणार आहे, असे सौरभ जोशी यांनी सांगितले.

विशेष चित्रफीत, पुस्तिका तयार करणार ढुमणे म्हणाले, ‘टीम म्हणून आम्ही विविध कामे हाती घेतली आहेत. यामध्ये सिद्धार्थ उद्यान चौक, हर्सूल टी पॉइंट चौक आणि खाम नदी चौकही आम्ही सुशोभित करणार आहाेत. यानिमित्त विशेष चित्रफीत, पुस्तिका व होर्डिंगद्वारे शहराचे ब्रँडिंग करण्यातही आमचे योगदान आहे.’ संजय कांकरिया म्हणाले, ‘शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ आणि सुंदर व्हावा यासाठी प्रशासनाच्या हातात हात घालून आम्ही काम करत आहोत. नागरिकांनीही यामध्ये भाग घ्यावा. सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर शहराची प्रतिमा नक्कीच बदलेल.’

बातम्या आणखी आहेत...