आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांना एमआयएमचे15 प्रश्न:विकासाबाबत खुलासा करा- एमआयएम; शिवसेना म्हणते या प्रश्नांमागे भाजपच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

औरंगाबाद येथे 8 जून रोजी शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे, हिंदु-मुस्लिम, औरंगाबाद-संभाजीनगर नामांतर यावर भाषण देऊन विकासाच्या मुख्य मुद्यावरुन दिशाभुल न करता औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रलंबित मुद्द्यांचे काय करणार याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे. याबाबतचे एक पत्रच एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादेतील खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

विकासाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा

मुलभुत सुविधेची कामे, प्रकल्प व प्रस्ताव पूर्ण होणार किंवा नाही? याबाबत खुलासा करावा तसेच नविन दिशाहीन घोषणा जाहीर करण्याऐवजी यापूर्वी घोषित केलेल्या विकासाच्या कामांचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

औरंगाबादकरांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा

औरंगाबादकरांची मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्री या नात्याने आपण नागरीकांच्या अपेक्षेचा मान राखुन सामान्य जनतेच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे निदर्शनास आणुन देण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

एमआयएमचे मुख्यमंत्र्यांना 15 प्रश्न

 1. औरंगाबाद शहराला मुबलक व वेळेवर पाणी मिळणार आहे किंवा नाही ? पाणी मिळणार असेल तर अचुक महिना आपण जाहीर करावा.
 2. औरंगाबादला मंजुर झालेले क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे परत आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न व त्याची सद्यस्थिती जाहीर करुन क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी निधीचे नियोजन कस करण्यात आले आहे कृपया त्याची माहिती जाहीर करावी.
 3. औरंगाबाद येथे मंजुर झालेले एम्स् इन्सटिट्युट कधी पूर्ण होणार आहे किंवा नाही ? कृपया याचा खुलासा करावा.
 4. औरंगाबाद येथे मंजुर झालेले कधी सुरु होणार आहे ? कृपया त्याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा.
 5. औरंगाबाद विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा कधी सुरु होणार आहे किंवा नाही ? कृपया याचा खुलासा करुन आखाती देशाकरिता विमानसेवा कधी सुरु होणार आहे याची तारीख जाहीर करावी. तसेच हज व उमराह यात्रेकरु साठी औरंगाबादहुन थेट विमानसेवा कधी सुरु होणार आहे ? कृपया याचा सुध्दा खुलासा करावा.
 6. ऑरिक सिटीत नविन कंपन्या येणार आहे किंवा नाही ? कृपया याचा खुलासा करावा. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याला राज्याचे उद्योगमंत्री हेच पालकमंत्री म्हणून लाभले. दावोस स्वित्झर्लंड येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत जगभरातील नामांकित कंपन्यांचे अधिकारी व उद्योगपती यांच्या सोबत चर्चा करुन पहिल्याच दिवशी विविध 23 हुन जास्त देशातील कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्यापैकी ऑरिक सिटी येथे किती कंपन्यांचे काम सुरु झाले ? किती गुंतवणुक झाली ? तसेच किती युवकांना रोजगार मिळाला?विशेष म्हणजे दावोस येथुन शहराला काय आणले ? कृपया त्याचा खुलासा करावा.
 7. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विकासाकरिता किती निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे अथवा नियोजित करण्यात आले आहे ? तसेच राज्यातील हजारो हेक्टर वक्फ मिळकतीचे संरक्षण करण्यासाठी कृपया आपले धोरण जाहीर करावे.
 8. औरंगाबाद येथील सफारी पार्क पूर्ण होण्यासाठी आणखी किती दशके लागणार ? कृपया खुलासा करण्यात यावा.
 9. औरंगाबाद शहरात मागील 30 ते 40 वर्षात आरक्षीत जागेवरील विकसित झालेल्या सर्व गोरगरीब वसाहतीमधील आरक्षणे रद्द कधी होणार ? औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत शहर विकास आराखड्यातील हरित पट्टयात व आरक्षीत जागेवर विकसित झालेल्या वसाहतींना गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमितीकरण करण्याची परवानगी कधी मिळणार ? कृपया जाहीर करण्यात यावा.
 10. सातारा-देवळाई भागात भुमिगत मलनि:सारणासाठी निधी कधी उपलब्ध होणार ? परिसरातील नागरीकांना मुलभुत सुविधा कधी मिळणार ? कृपया याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा.
 11. औरंगाबाद – शिर्डी या 112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ लवकरच होणार असल्याचे आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जाहीर केले होते ते कधी होणार ? कृपया जाहीर करावे.
 12. 17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनी आपण भाषणात भाविकांसाठी शिर्डी विमानतळ औरंगाबादशी जोडणार असल्याचे जाहीर केले होते ते कधी होणार ? कृपया खुलासा करावा.
 13. औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्या, औरंगाबाद महानरगपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इतर शासकीय विभाग व आस्थापनेत काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना शासन निर्णय, परिपत्रक व कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन, पी.एफ., ई.एस.आय.सी व इतर योजनांचा लाभ मिळणार आहे विंâवा नाही ? याचा खुलासा करुन कामगारांची आर्थिक पिळवणुक व कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय कार्यालय, विभाग व आस्थानांविरुध्द केलेल्या कार्यवाहीची माहिती जाहीर करावी.
 14. आपला पक्ष शिवसेना व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता असतांना निवासी वसाहती, व्यावसायिक प्रतिष्ठान, उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी नाल्यांतून उघड्यावरून वाहू नये म्हणुन 464 कोटीची निविदा मंजुर करुन भूमिगत गटार योजना राबविण्याचा संपुर्ण ठेका खिल्लारी कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आला होता. परंतु योजना पूर्ण न करता तत्कालीन सत्ताधारी यांच्यासोबत संगणमताने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला होता. सबब प्रकरणी संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करुन नागरीकांचे पैसे हडपणाऱ्याकडून वसुली करण्यात आली आहे किंवा नाही ? कृपया खुलासा करावा.
 15. आपला पक्ष शिवसेना व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता असतांना शहर विकासाचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला होता. तत्कालीन शिवसेना – भाजपा सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार करण्यासाठी सर्वसाधारण सभेला अधिकार नसतांना आराखड्यात सर्व नियम डावलुन सोयीनुसार बदल केले. त्यामुळे संपुर्ण आराखडाच रद्द झाला होता. तत्कालीन शिवसेना व भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी आर्थिक तडजोड करुन केलेल्या महाभ्रष्टाचारामुळे शहराच्या विकासाला चांलगीच खीळ बसुन शहराचे वाटोळे होवुन संपुर्ण शहर २० वर्ष मागे गेले आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत झालेल्या हजारो कोटीच्या महाभ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करुन सर्व संबंधितांविरुध्द आपण कायदेशिर कारवाई करणार आहे किंवा नाही ? कृपया आपण याचा जाहीररित्या खुलासा करावा.

शिवसेनेचा पलटवार

एमआयएमचे औरंगाबादेतील खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या पत्रावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, मी प्रकर्षाने निदर्शनास आणुन देतो की, 8 जुनची सभा ही मराठवाडयात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेली आहे.

बोलावता धनी भाजपच

अंबादास दानवे म्हणाले, बाटलीतून जीन बाहेर निघावा तसे हे एमआयएमचे पत्र आहे. यावरील शाई एमआयएमची असेलही, पण बोलावता धनी त्यांचा पाठीराखा भारतीय जनता पक्ष आहे. पत्रातील मागण्या करताना हे देखील जलील विसरले की यातील अनेक विषय हे केंद्र सरकारच्या कारभाराशि निगडित आहेत. आणि त्यांच्याच अखत्यारीत आहेत. एम्स, स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा, प्रादेशिक विमानसेवा सुरू करणे हे विषय दिल्लीत जाताना जलील सोयीस्करपणे विसरतात, हे जनतेला देखील दिसते.

तर खासदारांचे अज्ञान दुर होईल

अंबादास दानवे म्हणाले, ऑरीक सिटीच्या शेंद्रा नोडलमध्ये आता जागा शिल्लक राहिलेली नाही, वर्षभरात तिथे कारखान्यांची माळ लागलेली असेल याची माहिती जलील यांनीच ऑरीक सिटीच्या ऑफिसमधून घेतली तर त्यांचे अज्ञान दूर होईल. माहितीस्तव सांगतो हा आकडा 5000 कोटींच्या पुढे आहे. एवढीच गुंतवणुकीची चिंता होती तर 'ऑरीक'मध्ये झालेल्या कॉन्सुलेट जनरलच्या परिषदेत त्यांनी हजेरी का नाही लावली, वैयक्तिक भेट घेऊन कोणाकडून किती गुंतवणूक त्यांनी आणली हे जनतेला जलील यांनीच सांगावे असा सवालही त्यांनी केला.

पोटदुखी म्हणजे हे पत्र

अंबादास दानवे म्हणाले की, गुंतवणुकीची प्रक्रिया असते, जी सय्यद इम्तियाज आणि त्यांच्या पक्षाच्या आकलनाच्या पलीकडे आहे. त्यांच्या लेखी गुंतवणूक ही 'किराणा' दुकान उघडण्यासारखे सोपे असावे कदाचित. बाकी जनतेच्या अडचणींवर आम्ही काम करत आहोतच. ज्याला यावर राजकारण करायचे असते ते औरंगजेबाच्या खांद्यावर बसून कुभांड रचतात, आणि तुम्ही आणि तुमची बोलावती धनी भारतीय जनता पक्षही त्यातलेच आहेत अशी टीकाही त्यांनी केली. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा जोरदार होणार हे कळून चुकल्यावर झालेली ही पोटदुखी म्हणजे हे पत्र आहे.

बातम्या आणखी आहेत...