आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटी रुग्णालयातील परिचारिका (नर्स) आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर गेल्यामुळे पहिल्याच दिवशी रुग्णसेवेवर परिणाम झाला. त्यामुळे नियोजित १५ ऑपरेशन रद्द करण्यात आले आहेत. घाटीत ७०० परिचारिका, ४३४ चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा परिणाम स्वच्छतेवरही झाला आहे. रुग्णालयातील वाॅर्डांबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा तुंबला असून, त्याची दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे. घाटीत दररोज सुमारे १,२०० रुग्ण दाखल होतात, मात्र संपामुळे मंगळवारी ९५६ रुग्ण दाखल झाले.
संपामुळे रुग्ण वेठीस : घाटीत दिवसभरात २५ प्रसूती आणि आठ सिझेरियन झाले. प्रसूती विभागात पाच नर्स देण्यात आल्या आहेत. मात्र, महिलांना घेऊन जाण्यासाठी अडचणी येत आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनाच त्यांना घेऊन जावे लागत आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी नसल्यामुळे सफाईची समस्या येथेही पाहायला मिळली. सर्जरी विभागाने आज एकच शस्त्रक्रिया केली. १५ नियोजित शस्त्रक्रिया तूर्त स्थगित केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील १०७ नर्स संपावर : जिल्हा रुग्णालयात १०७ नर्स, ३४ चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर आहेत. पडेगाव येथील नर्सिंग कॉलेजमधून ३० विद्यार्थिनींना कामासाठी नियुक्त केले आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीकवळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील १४ ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांतील ६४१ कर्मचाऱ्यांपैकी २३५ कर्मचारी संपावर आहेत. जिल्हा परिषदेच्या ५१ आरोग्य केंद्रे, २७९ उपकेंद्रांतील ९२३ पैकी ३७७ कर्मचारी संपावर गेले आहेत.
३१५ कर्मचारी नर्सची व्यवस्था : अधिष्ठाता डॉ. संजय राठोड म्हणाले, घाटीत ७०० नर्सेस, ४३४ कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत. घाटीतील नर्सिंग कॉलेजच्या १४०, कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजच्या ६० आणि ११५ चतुर्थ श्रेणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे.
‘कॅन्सर’मध्ये १०० नर्स संपावर : शासकीय कर्करोग रुग्णालयात १०० नर्स संपावर आहेत. येथे ५० कंत्राटी कर्मचारी आहेत. येथे दररोज चार शस्त्रक्रिया केल्या जातात. आज केवळ एक शस्त्रक्रिया झाल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.