आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:राज्यात वैद्यकीय महाविद्यालयातील 15 हजार डॉक्टर-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणार : महाजन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणार आहेत. यात १४३२ निवासी वैद्यकीय अधिकारी, ७७८ डॉक्टरांची एमपीएससीनुसार भरती करण्यात येणार आहे, तर गट क चे ४५००, गट ड ३८७४ पदे भरण्यात येणार आहे. अशा एकूण १५ हजार जागा दोन महिन्यांत भरण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’चे शुक्रवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्या हस्ते शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील आदींची उपस्थिती हाेती.

एम्सच्या धर्तीवर सुविधांचा प्रस्ताव पाठवा कराड म्हणाले, देशात अनेक एम्स उघडली आहेत. महाराष्ट्रात नागपूरला आहे. घाटीच्या सुविधा वाढवण्यासाठी आणि त्याला एम्सचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाने पाठवावा. जिरियाट्रिक विभागाबाबत रिजनल सेंटरला मान्यता देणार आहे. त्यासाठी केंद्रस्तरावर बोलणे झाले अाहे. शासनाने याबाबतचा प्रस्ताव पाठवावा, असे डाॅ. कराडांनी सांंगितले. घाटीत सुविधा नसल्याच्या केलेल्या इम्तियाज यांच्या टीकेबाबत उत्तर देताना सावे म्हणाले, घाटीत सुपरस्पेशालिटीपासून इतर विविध सुविधा कशा वाढल्याचे सांगून कधीतरी कौतुक करा, अशी टोमणेबाजी केली. अंबादास दानवे यांनी शासनाच्या माध्यमातून डॉक्टर इतरत्र पळवले जातात. त्यामुळे येथील डीन चांगले काम करतात, असे सांगू नका अन्यथा ते पळवले जातील, असा टोमणाही मारला.

ट्रस्टच्या हॉस्पिटलमधील गरिबांचे बेड ऑनलाइन करणार : ट्रस्टचे राज्यातील हॉस्पिटलमध्ये गरिबांना बेड मिळत नाहीत. याबाबत पत्रकार परिषदेत महाजन यांंना विचारले असता, आमच्याकडेदेखील याबाबत तक्रारी आहेत. याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून नियमन होणे अपेक्षित आहे. मात्र, आता आम्ही गरिबांसाठी असलेले बेड ऑनलाइन दिसले पाहिजेत, अशी व्यवस्था करत आहोत. येत्या महिनाभरात ही व्यवस्था उभारणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

शहागंजमध्ये महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारा खासदार इम्तियाज जलील यांनी घाटीत मोठ्या प्रमाणातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली. तसेच घाटीतील प्रसूती विभागात जाऊन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी पाहणी करावी. प्रसूती झालेल्या महिला बेड नसल्यामुळे फरशीवर झोपलेल्या असतात. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे इम्तियाज यांनी सांगितले. वैद्यकीय हॉस्पिटलला मंजुरी देताना शासन डॉक्टरांची पळवापळवी करते. येथील डॉक्टर जळगाव-धुळेला नेल्याचेही त्यांनी निदर्शनास अाणून दिले. शहागंजमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रसूती हॉस्पिटल उभारण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

पैठणला १०० बेडचे रुग्णालय करा : पालकमंत्री पैठण तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सध्या पैठणमध्ये ३० बेडचे रुग्णालय अाहे. ते १०० बेडचे करण्याचा प्रस्ताव पाठवला अाहे. त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केल्यानंतर महाजन यांनी १०० बेडच्या रुग्णालयांना मान्यता दिल्याची घोषणा केली.