आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, कन्नड व बीडच्या गेवराई तालुक्यात भगर खाल्ल्याने १५६ जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. वैजापूर तालुक्यात विषबाधा झालेल्यांची संख्या ११८, कन्नडमध्ये १२ तर गेवराई तालुक्यातील २६ जणांवर उपचार सुरू आहेत.
वैजापुरात सोमवारी (२६ सप्टेंबर) रात्री ९ ते मंगळवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या गावातून बाधित रुग्णांच्या संख्येत सकाळपर्यंत वाढ झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय विभागातील सूत्रांनी दिली. मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने वैजापुरातील सिद्ध अलंकार ट्रेडर्सवर कारवाई करत १३ हजार १२० रुपयांची ८२ किलो निकृष्ट भगर जप्त केली.
दरम्यान, वैजापुरात सर्वांना सरकारी व खासगी रुग्णालयात भरती केले. शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ३६, तसेच विविध आठ खासगी रुग्णालयांत ७० जणांवर उपचार सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन तारपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास डुकरे उपचार करत आहेत. आमदार रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान यांनीही रुग्णांना मदत केली. दरम्यान, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ.तारपे म्हणाले. वैजापुरात अन्न व औषध प्रशासनाने ८२ किलो भगर केली जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई वैजापूर तालुक्यात अन्न व औषधी विभागाच्या तालुका सुरक्षा अधिकारी ज्योत्स्ना जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुलक्षणा जाधवर, मेधा फाळके, के.बी.तुपे, श्रीराम टापरे यांच्या पथकाने रुग्णांची भेट घेऊन जबाब नोंदवले. पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनीही रुग्णालयात जाऊन आढावा घेतला.
कन्नड : १२ महिलांना विषबाधा, ८ जण औरंगाबादला कन्नड | तालुक्यातील १२ महिलांना भगरीतून विषबाधा झाली. त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी आठ महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.शरदसिंग राजपूत यांनी सांगितले. कविता बळीराम राठोड (४५), निकिता बळीराम राठोड (१८) अनिता तानाजी अहिरे (४५), शालुबाई बाबुराव घुले (३५), पूर्णा अशोक जाधव (३५), छल्लीबाई नारायण जाधव (४५), मालताबाई जगन्नाथ बोर्डे (३५), सुनीता साईनाथ बोर्डे (३५), कांताबाई भागीनाथ जेठे (३५), निर्मला संजय काळे (३६), सोनाली ज्ञानेश्वर थोरात (४०) व अन्य एक अशा १२ महिलांना चक्कर, उलट्या, मळमळ असा त्रास झाला. भगर घेताना ही घ्यावी काळजी
पॅकिंगच्या भगरीपेक्षा खुली भगर स्वस्त मिळत असल्याने जास्त खरेदी. त्यामुळे विषबाधेचा प्रकार घडला भगर किंवा कुठल्याही पॅकिंगच्या वस्तू अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाकडून प्रमाणित असतात. पॅकिंगची भगर घेतल्यास त्यावर उत्पादन दिनांक व एक्स्पायरी डेट असते. त्यामुळे ती सुरक्षित. खाद्यपदार्थ, शिळे अन्न विक्रीसाठी प्रशासनाने निर्बंध घातलेले आहेत. पॅकिंगच्याच वस्तू घ्याव्यात, असे अन्नसुरक्षा अधिकारी जाधव म्हणाल्या.
बीड/गेवराई| बीड तालुक्यातील जुजगव्हाण, लक्ष्मीआई तांडा व गेवराई तालुक्यातील गुळज येथे भगर खाल्ल्याने २६ जणांना विषबाधा झाली. यात १३ महिलांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. बीड तालुक्यातील लक्ष्मीआई तांडा व जुजगव्हाण येथील नागरिकांनी एका दुकानावरून भगरीचे पीठ आणले. ते खाल्ल्याने १६ लोकांना मळमळ, उलटी, जुलाब, चक्कर येणे, पोटदुखीचा त्रास झाला. यातील काहींना बीड तर काहींना बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. १६ पैकी सात जणांनी तालुक्यातील नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा तरकसे व डॉ. सोनाली सानप यांनी उपचार केले. परंतु एका गर्भवती महिलेला बीड जिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री दाखल केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी तिच्यावर उपचार केले. दुसरीकडे, गेवराई तालुक्यात गुळज गावात दहा जणांना सोमवारी रात्री विषबाधा झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.