आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑरिक सिटी येथे “अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’ चे शानदार उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी लेखी शुभेच्छा दिल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. मसिआचा पुढील एक्स्पो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होईल, या शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी औरंगाबादमधील उद्योग समूहास दिलासा दिला. औरंगाबादमध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंट उभारण्यासाठी राज्याने ५० एकर जमीन दिली, तर केंद्राच्या निधीतून काम पूर्ण करण्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या वेळी दिली. पहिल्याच दिवशी १६ हजार ३२२ नागरिकांनी यास भेट दिली.
मुख्यमंत्र्यांनी आणले पाणी : अतुल सावे, सहकारमंत्री
जायकवाडीचे पाणी हलके असून ते औषधी आणि मद्यनिर्मितीसाठी पोषक आहे. यासोबत औरंगाबाद ऑटोमोबाइल व ऑटो कम्पोनंटचे हब आहे. ऑरिकमध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभे राहिले तर वर्षभर विविध क्षेत्रांतील एक्स्पाे घेता येतील. शहराच्या पाण्याची समस्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दूर केली आहे. रखडलेल्या प्रकल्पाला निधी देऊन तो मार्गी लावला आहे. अमृत याेजनेत याचा समावेश केल्याने अडचणी दूर झाल्या आहेत.
स्वस्त वीज मिळावी : किरण जगताप, अध्यक्ष मसिआ
एमआयडीसीबाहेर आता औद्याेगिक क्षेत्र विस्तारत आहे. हे लोक कर भरतात. मात्र, एनए नसल्याने त्यांना सबसिडी मिळत नाहीय. त्यांना रोड, वीज, पाणी देता येत नाही. त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात वीज गळतीचे प्रमाण ३५ टक्के आहे. यामुळे वीज महाग आहे. नवीन उद्योग येताना त्याचा विचार करतात. गळती थांबली तर वीज स्वस्त होऊन उद्योग आकर्षित होतील.
शेतीपूरक, लघुउद्योग क्षेत्रात या एक्स्पोचे योगदान : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना या एक्स्पोच्या उद्घाटनासाठी आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. परवापर्यंत ते ऑनलाइन हे उद्घाटन करतील असे आयोजकांनी सांगितले होते. प्रत्यक्षात आज मोदींचे लेखी शुभेच्छापत्र आयोजकांना पाठवण्यात आले. भारताच्या आर्थिक प्रगतीत, रोजगार निर्मितीत लघुउद्योजक महत्त्वाची कामगिरी बजावत असल्याचे ते म्हणाले. हा एक्स्पो शेतीपूरक उद्योग आणि लघुउद्योग यांच्या विकासाचे आदर्श व्यासपीठ ठरेल, अशा शुभेच्छा त्यांनी या पत्राद्वारे कळवल्या.
आम्ही सहामाही उत्तीर्ण झालो : एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हे सरकार सहा महिने पूर्ण करत आहे. सहामाही परीक्षेत आम्ही उत्तीर्ण झालो. मेेरिटमध्येही आलो. आता वार्षिक परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकावर यायचे आहे. आम्ही केवळ वजनदार नेत्यांच्या मतदारसंघात विकास न करता सर्वसमावेशक विकास करतो. आम्ही उद्योजकांच्या भेटीगाठी घेतो. घरात बसून बाहेरच्या समस्या कशा समजतील? उद्याेगांना आता पूर्वीचे अनुभव येणाार नाहीत. मोदींचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे एक्स्पो महत्त्वाचे आहे.
सकाळच्या टीकेपेक्षा कौतुक करा : उदय सामंत, उद्योगमंत्री
राज्याचे उद्योगमंत्री सामंत म्हणाले, महा-एक्स्पोप्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारला सर्वकाही “महा’ करायचे आहे. मराठवाड्यावर अन्यायाचा पाढा वाचला जातो. मात्र, मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री मराठवाड्यातील आहेत. राजकर्त्यांनी मसिआकडून शिकले पाहिजे. प्रत्येक सदस्य दुसऱ्याला मान देतो. प्रत्येकाचा आदर करतो. हे राज्यकर्त्यानी शिकायला हवे. यातून सकारात्मकता येते. रोज सकाळी ९ वाजता टीव्हीसमोर बोलणाऱ्यांकडून नकारात्मकता दिसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.