आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या लाटेची भीती:दुसऱ्या डोसची तारीख निघून गेली तरी 1.‍69 लाख लोकांची लसीकडे पाठ, लसीकरण वाढवण्यासाठी मनपाने सुरू केली तयारी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील बारा वर्षापुढील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, अल्प प्रतिसाद मिळत आहे. - Divya Marathi
शहरातील बारा वर्षापुढील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, अल्प प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाची तिसरी लाट ओसरली. रुग्णसंख्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याने आैरंगाबाद मनपाकडून काेविड सेंटर बंद करण्यात आले. दुसरीकडे दक्षिण कोरिया, चीनसारख्या देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या आकडेवारीचा अभ्यास करून शहरातील आरोग्य यंत्रणेनेही तयारी सुरू केली आहे. २२ जूनच्या दरम्यान भारतात कोरोनाची चौथी लाट येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. शहरातील १.६९ लाख लोकांची दुसऱ्या डोसची तारीख निघून गेली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

शहरातील रुग्णसंख्या अगदी कमी झाल्यामुळे अनेकांनी लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. शहरातील लसीकरणाचे उद्दिष्ट १० लाख ५५ हजार आहे. त्यामुळे ८७ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर फक्त ६२ टक्के लोकांनीच दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे १ लाख ६० हजार लोकांचा दुसरा डोस घेण्याची तारीखही निघून गेली आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने विविध विभागांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. आयएमए, पोलिस, महाविद्यालये, उद्योग, खासगी संस्थांना स्मरणपत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती मंडलेचा यांनी दिली.

टास्क फोर्समध्ये चर्चा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत फारसे नुकसान झाले नसले तरी चौथ्या लाटेची गांभीर्याने तयारी करण्यात येत आहे. जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत तसे आदेशही देण्यात आले आहेत.

शहरातील ऑक्सिजन बेडची व्यवस्था, कोविड सेंटर आणि इतर आरोग्य सुविधांची तयारी करणे सुरू आहे. लसीकरणामुळे रुग्ण गंभीर झाले नाहीत असे समोर आले आहे. त्यामुळे पहिला आणि दुसऱ्या डोसवर विशेष भर देण्यात येत आहे. शहरातील १ लाख ८० हजार असे नागरिक आहेत, ज्यांनी अजून कोरोना लसीकरणाचा पहिला डोसदेखील घेतलेला नाही. लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात १५ ते १८ वयोगटातील ६९ हजार आणि १२ ते १४ वयोगटातील ५६ हजार मुलांचे लसीकरण करण्याचे लक्ष आहे. शहरातील एकूण १० लाख ५५ हजार ३१ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात लहान मुलांचा समावेश नाही.

नागरिकांनी पुढाकार घ्यावा
लसीकरणामुळे रुग्ण गंभीर होत नाही, हे तिसऱ्या लाटेत समाेर आले आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. शहरातील आरोग्य केंद्रांत मोफत लसीकरणाची सोय केली आहे. लहान मुलांचेदेखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. - डॉ. पारस मंडेलचा, मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा.

बातम्या आणखी आहेत...