आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे प्लास्टिक जाळल्याने हवेचे प्रदूषण सुद्धा होते. परंतु, प्लास्टिक व कचऱ्याचा योग्य पुनर्वापर केल्यास प्रदूषण नियंत्रण ठेवता येईल. असाच एक प्रयोग शहरातील फाइन आर्टचे शिक्षण घेणाऱ्या कल्याणी भारंबे, नमिता कपाळे यांनी यशस्वी केला. त्यांनी ७ ट्रॅक्टर माती, भुसा, १६ हजार टाकाऊ बॉटल्सपासून इको ब्रिक्स तयार करून दौलताबाद-शरणापूर फाटा रोडवरील एका ठिकाणी पाच झोपड्या उभारल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिक आणि कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील पडलेल्या प्लास्टिक जनावरांच्या पोटात जाऊन अनेक जनावरे दगावली जातात. अनेक जनावरांच्या पोटातून प्लास्टिक काढले आहे. एवढेच नव्हे तर नदी, नाल्यात प्लास्टिक अडकते. त्यामुळे अनेकदा ड्रेनेजलाइनसुद्धा ब्लॉक होतात. दुसरीकडे रस्त्यांवरील कचऱ्याची विल्हेवाट योग्यरीत्या लावली नाही तर जल, वायू प्रदूषणसुद्धा वाढते.
शहरातील शासकीय कला महाविद्यालयात बीएफए आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एमएफएचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या कल्याणी भारंबे, नमिता कपाळे यांनी लॉकडाऊनकाळात आरो व्हिलेज सिटीचे यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले. तसेच, गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांकडून शाळेच्या फीसऐवजी मुलांकडून टाकाऊ बॉटल्स आणि कचरा घेऊन त्यापासून बॉटल्स ब्रिक्स तयार करतात. हे पाहून शहरात असा प्रयोग करता येऊ शकेल, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यानंतर त्यांनी गुगलवर माहिती संकलित करून ३ महिने संशोधन केले. त्यानंतर चार महिन्यांत विविध भागांतून १६ हजार बॉटल्स व कचरा जमा केला.
पावसाळा, हिवाळा, उन्हाळ्यात घरांची चाचणी घेतली
रिकाम्या बॉटल्समध्ये कचरा भरून हवाबंद केले. त्यासाठी हजारो बॉटल्स जमा करून भिंतीची उभारणी केली. या २० बाय २०, १० बाय १० आणि ११ बाय १५ अशाप्रकारे तीन फुटांच्या भिंती उभारल्या. एवढेच नव्हे तर १९ बाय १९, ३४ बाय ९.५ फुटांपर्यंत भिंती उभारून झोपड्या तयार करण्यात यश मिळवले. त्यांनी तिन्ही ऋतुंमध्ये या घरांची चाचणी घेतली आहे.
लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक
कचरा व प्लास्टिक घातक असून त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. घराच्या आसपास असलेल्या मोकळ्या जागेवर बसण्यासाठी बाकडे तयार करू शकतो. याची लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. -नमिता कपाळे
विविध भागांत बाकडे तयार करणार
प्लास्टिक व कचऱ्याचा पुनर्वापर करून भिंती बनवण्यास मदत हाेते. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता शहरातील विविध भागांत नागरिकांना बसण्यासाठी बाकडे तयार करणार आहे. यात खाम नदीचे काम हाती घेतले आहे. -कल्याणी भारंबे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.