आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुणी लॉटरी लागल्याची थाप मारून तर कुणी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवून लाखो रुपये गमावल्याच्या दोन घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. मागील ४८ तासांमध्ये शहरात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल झाले असून एकूण फसवणुकीचा आकडा एक कोटीहून अधिक रकमेच्या घरात गेला आहे.
प्रकरण १ : बजाज कंपनीतून सेवानिवृत्त सुधाकर मारुती खंडागळे (५८) यांना लॉटरी लागल्याची थाप मारून भामट्याने ३४ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातला. ११ महिन्यांपूर्वी खंडागळे यांना व्हॉट्सअॅपवर ‘केबीसी - कोन बनेगा करोडपती’च्या नावाने मेसेज आला. त्यात ३३ लाख व ५१ लाख रुपयांचे लकी ड्रॉ लागल्याचा मेसेज होता. त्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्या क्रमांकावर संपर्क साधला. भामट्याने १ कोटी १५ लाख रुपये देण्यासाठी आधी १ लाख ७० हजार रुपये कर भरावा लागेल असे सांगितले. खंडागळेंनी सुरुवातीला ५ हजार रुपये दिल्यावर सायबर भामट्यांच्या टोळीतील १७ जणांनी विविध कारणे सांगून त्यांच्याकडून ३४ लाख ६ हजार ४९७ रुपये उकळले. या सर्व रकमा खंडागळे यांनी राष्ट्रीय बँकांच्या खात्यांवर पाठवल्या आहेत हे विशेष.
प्रकरण २ : एनीडेस्क अॅपवरून ९५ हजार लुटले
पैठण एमआयडीत काम करणाऱ्या प्रशांत हरीश दीक्षित यांनी ४ एप्रिल रोजी मोबीक्विक अॅपवरून क्रेडिट कार्डचे १६ हजार रुपये बिल अदा केले. मात्र, रक्कम जमा झालीच नाही. त्यांनी गुगलवरून मोबीक्विक अॅपचा हेल्पलाइन क्रमांक शोधून त्यावर कॉल केला. भामट्याने ‘एनीडेस्क’ अॅप इन्स्टॉल करायला लावले. अॅप इन्स्टॉल करताच त्यांच्या खात्यातून तीन वेळेस ३० हजार, एकदा सहा हजार रक्कम टाकून पैसे जमा होताय का हे तपासण्यास सांगितले. मग दोन मिनिटे मोबाइल बाजूला ठेवण्यास सांगितले. तोपर्यंत सर्व डेटा रिसेट झाला. सायबर भामट्यानेे त्यांच्याकडून कोड घेऊन मोबाइल व मोबीक्विक अॅप दोन्ही संपूर्ण रिसिट केलेले होते अन् क्षणार्धात त्यांच्या खात्यातील ९५ हजार ९९९ रुपयेदेखील वळते झाले.
प्रकरण ३ : आयुर्वेदिक औषधीच्या नावाखाली ४.५५ लाखांची फसवणूक
विमल सोनार (५७, रा. एन-७) यांना कमी किमतीत आयुर्वेदिक औषध देण्याचे आमिष दाखवून डॉ. दिलीप गणेश जैस्वाल (रा. सातारा) व प्रीती राजेंद्र बडगुजर यांनी ४ लाख ५५ हजार रुपयांना फसवल्याची तक्रार दाखल झाली. सोनार यांचा मुलगा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. काही महिन्यांपूर्वी त्या नातलगाकडे गेल्या असता त्यांना व्हेस्टिज कंपनीची आयुर्वेदिक औषधी दिसली. ती वापरुन पाहिल्यानंतर त्यांना आवडली. मग विमल यांनी नातेवाइकांकडे मागणी केली. त्यानंतर सोनार यांचे जैस्वाल यांच्यासेाबत बोलणे झाले. आयडी तयार करण्याचे सांगून त्याने सुरुवातीला सोनार यांच्याकडून ५० हजार रुपयांचा बेअरर चेक घेतला. आणि तो फरार झाला. सोनार यांच्यासह त्यांची नणंद सुतार व राम पुणेकर यांच्याकडून जैस्वाल व बडगुजरने ४ लाख ५५ हजार रुपये घेतले. परंतु औषध दिले नाही. पैशाची मागणी करताच धमकावून ते फरार झाले. सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरण ४ : हाॅटेल व्यवस्थापकाकडून मालकाला १८ लाखांचा गंडा
समर्थनगरमध्ये अर्जुन चव्हाण यांचे इरा हॉटेल व बार आहे. गणेश जया शेट्टी हा मूळचा कर्नाटकचा त्यांच्या हॉटेलवर व्यवस्थापक होता. प्रामाणिकपणे काम करून त्याने चव्हाण यांचा विश्वास जिंकला. दोन वर्षांपूर्वी वडील आजारी असल्याचे सांगून मदत मागितली. चव्हाण यांनी आईचे दागिने गहाण ठेवत ३ लाख ४१ हजार रुपये दिले. त्यापैकी १ लाख ९१ हजार रुपये त्याने परतही केले. पण उर्वरित रक्कम परत दिली नाही. संशय आल्याने चव्हाण यांनी हिशेब तपासला असता २०२० पासून हॉटेलमध्ये १३ लाख ८७ हजार ५९९ रुपयांचा घोळ केला. अडीच लाख रुपयांची दारू उधार दिली व हिशेब न सांगितल्याचेही उघड झाले. विचारल्यानंतर गणेशने पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. चव्हाण यांनी दया दाखवत त्याला कामावर ठेवले. मात्र, तो पुन्हा गल्ल्यातून एक लाख रुपये लंपास करुन पसार झाला. त्याच्याविराेधात १८ लाख ८७ हजार ५९९ रुपयांच्या अपहाराचा गुन्हा क्रांती चाैकात दाखल झाला.
प्रकरण ५ : निवृत्त शिक्षकाचे लाखो रुपये लाटले
सेवानिवृत्त शिक्षक संजय जगन्नाथ जाधव यांची नंदुलाल राजाराम खैरनार, गणेश नंदुलाल खैरनार व विजया बँकेचे व्यवस्थापक भूषणचंद्र आर्य यांनी २१ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली. या चाैघांची आधीपासून मैत्री होती. वरील तिघांनी जाधव यांना कमी दरात वाळूज परिसरात सोसायटीतले दोन प्लॉट घेऊन देण्याचे व शेतीवर फार्महाऊस बांधण्यासाठी चार टक्क्यांनी कर्ज देण्याचे आमिष दाखवले. जूनपर्यंत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. त्यानंतर आश्वासनातील एकही काम केले नाही. पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. जाधव यांच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.