आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाचा टाहो:गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर 19 वर्षीय विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू; औरंगाबादेत नातेवाइकांनी हॉस्पिटल फोडले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर तासाभरात हृदयविकाराचा झटका आल्याने १९ वर्षीय तहेरीन अस्लम खान (रा. उंट मोहल्ला, सब्जीमंडी) या विवाहितेचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी इंटरनॅशनल हॉस्पिटलची तोडफोड केली. शनिवारी तहेरीनचा मृतदेह घेऊन नातेवाइकांनी जिन्सी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. या नातेवाइकांवर गुन्हा दाखल झाला.

खान कुटुंबीयांच्या माहितीनुसार, दीड महिन्यापासून तिच्यावर एमजीएम हॉस्पिटलसमोरील इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये गर्भपिशवीतून रक्तस्त्रावामुळे उपचार सुरू होते. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेसाठी तिला ३ नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनलमध्ये भरती करण्यात आले. शुक्रवारी दुपारी तीन वाजता भूलतज्ज्ञ डॉ. इलियास यांनी भूल दिल्यावर लॅप्रोस्कोपीतज्ज्ञ डॉ. विनोद भिवसाने यांनी शस्त्रक्रिया केली. मात्र काही वेळातच तिची प्रकृती खराब झाली म्हणून रात्री दहा वाजता इंटरनॅशनलच्या दोन डाॅक्टरांनी तिला एमजीएममध्ये दाखल केले. तोपर्यंत तिची प्रकृती चिंताजनक झाली होती.

पंधरा ते वीस जणांनी केली तोडफोड

अकरा वाजता तिचे वडील मुसाखान शमशेर खान, पती अस्लम खान अन्य १५ पुरुष, महिलांनी इंटरनॅशनल रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना बाहेर बोलावण्याची मागणी केली. त्यांचे बोलणे सुरू असतानाच काहींनी दगडफेक केली. सीसीटीव्ही कॅमेरे, टीव्ही फोडले. खुर्च्या, बाकडे रस्त्यावर फेकले. याची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बाऊन्सर, सुरक्षा रक्षक असताना हा प्रकार झाला. याप्रकरणी डॉ. अफजल नूर मोहंमद मुर्तुजा खान (५८) यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रुग्णाला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले : डाॅ. खान

इंटरनॅशनल हॉस्पिटलचे संचालक डॉ. अफझल खान म्हणाले, ३ नोव्हेंबरच्या तपासणीत तिच्या गर्भपिशवीत जखमेवर सूज दिसल्याने दुर्बिणीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर तिला हृदयविकाराचा झटका आल्याने आयसीयूमध्ये हलवले. मात्र, रात्री डायलिसिसची गरज लागू शकते अशी शक्यता होती. ही सुविधा आमच्याकडे नसल्याने आमच्याच दोन डॉक्टरांच्या निगराणीत एमजीएमला हलवले. एमजीएम व्यवस्थापनाशी बोलून बेड मिळवून दिला. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक शिवीगाळ करत अंगावर धावून आल्याने डॉक्टर तेथून निघून गेले. एमजीएममधील पुढील प्रक्रिया करण्याएेवजी नातेवाइकांनी आमच्या हाॅस्पिटलकडे मोर्चा वळवून तोडफोड केली. आमच्याकडून गेल्यानंतर आठ ते नऊ तास रुग्ण एमजीएममध्ये होता. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल. आम्ही रुग्णाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तो अपयशी ठरल्याचे दु:ख आहे. रुग्णाच्या नातेवाइकांकडे बिलाचीही मागणी केली नाही.

आमच्याकडे आणले तेव्हा ती चिंताजनकच होती

त्या विवाहितेवर घाटीमध्ये सहा महिन्यांपूर्वी उपचार झाले. काल तिला इंटरनॅशनल हाॅस्पिटलच्या दोन डाॅक्टरांनी एमजीएममध्ये दाखल केले. तेव्हा तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. तिचा रक्तदाब कमी झाला होता. त्यामुळे तिला आयसीयूमध्ये पाठवून तातडीने व्हेंटिलेटर लावले. दरम्यान, इंटरनॅशनलचे डाॅक्टर उपचारांची कागदपत्रे विवाहितेच्या नातेवाइकांकडे देऊन निघून गेले. - एच. आर. राघवन, वैद्यकीय अधीक्षक, एमजीएम

पुढे काय?

रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टरांविरोधात तक्रार घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मेडिकल बोर्डाकडे पाठवण्यात येईल. शासकीय तज्ज्ञ डॉक्टर प्रकरणाचा सखोल अभ्यास करतील. त्यांच्या अहवालानंतरच गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय होईल.

बाउन्सर वाढवले, समोरील रुग्णालय बंद

शनिवारी रात्री उशिरापर्यंत इंटरनॅशनल हॉस्पिटलला पाेलिसांचा बंदोबस्त होता. दिवसभर रुग्णालय सुरू होते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळनंतर ते बंद करून बाहेर चार बाउन्सर उभे करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...